नारायण राणेंकडून कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवात विशेष ‘मोदी एक्सप्रेस’
मुंबई : दरवर्षी गणेशोत्सवावेळी कोकणवासीयांसाठी राणे कुटुंबियांकडून बसेस सोडण्यात येतात. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. त्यामुळे, यंदा बसेसऐवजी विशेष रेल्वे गाडी कोकणवासीयांसाठी सोडण्यात येणार आहे. मोदी एक्सप्रेस या नावाने ही ट्रेन मुंबईतून सुटणार असून कोकणातील कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडी येथे घेऊन जाणार आहे. दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर ८ वरुन ही ट्रेन सुटणार आहे. या प्रवासादरम्यान, कोकणवासीयांना १ वेळचं जेवणही देण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये १८०० नागरिक, प्रवासी बसण्याची क्षमता आहे. या प्रवासासाठी संबंधितांशी संपर्क करण्याचं आवाहनही नितेश राणे यांनी केलं आहे. २७ ऑगस्टपर्यंत सबंधितांना फोन करुन आपली सीट रिझर्व्ह करा, असे आवाहनही राणेंनी केले आहे. त्यामुळे, कोकणवासीयांचा मोफत प्रवास होणार असून आता गावची आणि गणेशोत्सवाची ओढ सर्वांनाच लागली आहे.
गणपती उत्सव म्हणजे मराठीजनांच्या एकतेचं अन् उत्साही उत्सावाचं प्रतिक होय. गल्लीबोळात उभारणारे मंडप ते मुंबईच्या लालबागच्या राजाचा थाट हे गणेशोत्सवाचं आकर्षण असतं. त्यासोबतच, कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा हा सण आहे. दरवर्षी मुंबईत स्थिरावलेले कोकणवासी गणेशोत्ववासाठी आपल्या गावी जातात. यंदाही ते गावी जाणार आहेत, त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी कोकणवासीयांसाठी मोठी घोषणा केली आहे.
दरम्यान, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे २२०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, गणेशोत्सवासाठी ४ ते १० सप्टेंबर २०२१ दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील. तर १४ ते २० सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील.