नारायण राणेंकडून प्रवीण दरेकरांचा पाणउतारा
चिपळूण : केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले भाजपा नेते नारायण राणे यांनी नुकताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत पूरग्रस्त चिपळूणचा शहराचा दौरा केला. यावेळी नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. यादरम्यान राणेंनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवीण दरेकरांचाही सर्वांसमोर पाणउतारा केल्याचं दिसलं.
देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत नारायण राणे पूरग्रस्त चिपळूणची पाहणी करण्यासाठी आले होते. चिपळूणमधील पाहणीच्या वेळी एकही सरकारी अधिकारी सोबत नसल्यानं राणे चांगलेच भडकले होते. सुरुवातीला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून झापलं, ‘मी इथं बाजारपेठेत उभा आहे. तुमचा एकही माणूस आमच्यासोबत नाही,’ असं राणे म्हणाले. त्यानंतर तिथे आलेल्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलंच सुनावलं. ‘पूरग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू असताना तुम्ही दात काढता, ऑफिसमध्ये काय करता, तिथे का नाही आलात, असे प्रश्न विचारत राणे अधिकाऱ्यांना होते.
राणे अधिकाऱ्यांना झापंत होते त्यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. यानंतर राणेंनी ‘थांब रे मध्ये बोलू नको…’ असं म्हणत दरेकरांना गप्प केलं. राणेंनी आपल्याच पक्षातील मोठ्या नेत्याचा एकेरीत उल्लेख करून पाणउतारा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. दरम्यान, राणेंनी यावेळी अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचंही बोललं जात आहे. ‘आम्ही इथं फिरायला आलो आहे का? तुमचा एकही अधिकारी इथं कसा नाही? लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तुम्ही इथं दात काढताय? लोकं रडत आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. विरोधी पक्षाचे नेते इथं आलेत, तुम्ही ऑफिसमध्ये काय करताय? तुम्हाला सोडू का मॉबमध्ये?,’ अशा शब्दांत राणेंनी त्या अधिकाऱ्याला झापलं.