
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही लसीकरणाचे वर्षाला ११० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. महिन्याला १० कोटी लसींचे उत्पादन ही सोपी गोष्ट नाही. मोदी सरकार वर्षअखेरीस लसीकरण पूर्ण होण्याचे आश्वासन देत आहे. त्यांनी अशा थापा मारणे बंद करावे. अशी जोरदार टीका सायरस पुनावाला यांनी मोदी सरकावर केली आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सायरस पुनावाला यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यावेळी त्यांनी परखड आणि स्फोटक मते व्यक्त केली. राजकारणी थापा मारत आहेत. आम्ही महिन्याला १० कोटी लसींचं उत्पादन करतो. महिन्याला एवढं मोठं उत्पादन करणं सोपं नाही. जगात कोणतीही एक कंपनी १० ते १२ कोटी लसींचं उत्पादन देऊ शकत नाही. पण आम्ही अॅडव्हान्समध्ये प्रयत्न करून आणि हजारो कोटींची गुंतवणूक करून हे केलं आहे. म्हणून ११० किंवा १२० कोटी डोसपर्यंत आम्ही दरवर्षी लसी देऊ. त्या प्रमाणे तुम्हाला कॅलक्यूलेट करावं लागेल. तसेच बाकीचे उत्पादक महिन्याला एक किंवा दोन कोटी लसी देतील. तर त्याप्रमाणे इम्यूनायझेशन वाढेल. यावरून राजकारणी किती लोकांना व्हॅक्सिन देऊ शकतात आणि किती थापा मारतात याचा विचार तुम्हीच करा, असं पुनावाला म्हणाले.
मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालून अतिशय वाईट गोष्ट केलीय. माझा मुलगा मला म्हणाला की यावर बोलू नको, पण मी बोलणार आहे. कारण सिरम इन्स्टिट्यूट अनेक वर्षांपासून जगातील १७० देशांना लस पुरवते. पण आता त्यांना गरज असताना त्यांना लस देता येत नाही. या देशांनी लसीसाठी आधीच पैसै दिलेत. बिल गेट्स फाउंडेशनने पाच हजार कोटी रुपये दिलेत. लसींची निर्यात सुरू केली पाहिजे. अनेक देशांनी आगाऊ पैसे दिले आहेत. त्यांना लसी पाठवायच्या आहेत. असेही ते म्हणाले आहेत.
कॉकटेल लसींच्या बाबतीत बोलताना ते म्हणाले, मी कॉकटेल लसीच्या विरोधात आहे. पण आताच्या लसींची परिणामकारकता कमी होऊ शकते. बुस्टर डोसची गरज पडेल. त्यासाठी मी आणि माझ्या कर्मचाऱ्यांनी तिसरा डोस घेतला आहे. कोव्हीशिल्डच्या दोन डोसमध्ये दोन महिन्यांचे अंतर हवे. कोरोना झालेल्यांनी सहा महिन्यांनी लस घ्यावी. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट केलं. लॉकडाऊन नसावा. एकदाच किड जाईल आणि लोकांना हर्ड इम्युनिटी मिळेल. खूप लोकं मरत असतील तर लॉकाडाऊन उत्तम आहे. पण लो रेट असताना ५० ते ६० टक्के लोक मेले ते निष्काळजीपणाने मेले. कोणी दवाखान्यात वेळेवर गेले नाहीत, कुणाकडे उपचारासाठी पैसे नव्हते तर काही लोक देवाच्या भरवश्यावर राहिले. विविध कम्युनिटीच्या लोकांनी तर सुरुवातीला उपचार नाकारले आणि व्हॅक्सिनही नाकारली. पण आजाराचा प्रकोप वाढल्यानंतर ते रुग्णालयात आले. त्यामुळे उशिर झाला होता. दवाखान्यात तात्काळ येऊन उपचार घेतला तर मृत्यूचं प्रमाणही कमी होतं, असं त्यांनी सांगितलं. राज्यातील मृत्यूचं प्रमाण कमी झालं आणि व्हॅक्सिनची मागणी कमी झाली तर मला काही फरक पडणार नाही. मला लोकांच्या दु:खातून पैसा जमवायचा नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
पुण्याबाबत मोदी सरकारचे उत्तर नाही
मी सरकारला सांगितले की पुण्याला जास्त लस द्या कारण पुण्यात जास्त कोरोना आहे..पण ते माझे एकत नाहीत. पुण्यात जास्त कोरोना, इथे लस द्याव्या असा आमचा विचार होता. मात्र, मोदी सरकारने उत्तर दिले नाही.




