…तेव्हा गडकरींना शिवसेनेची कार्यपद्धती माहित नव्हती का?; नाना पटोलेंचा खोचक सवाल
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामात होत असलेल्या अडवणुकीबाबत एक पत्र लिहिलं आहे. शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या अडवणुकीबद्दल अत्यंत स्फोटक पत्र गडकरींनी लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही या पत्राची तत्काळ दखल घेत थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गडकरींच्या या पत्रावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींना टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचं काम व्हायला पाहिजे. जे लोक याला विरोध करतात, काम बंद पाडतात, त्यांचं समर्थन काँग्रेस करत नाही. रस्ते व्हावे या बाजूने काँग्रेस आहे. पण २५ वर्षे शिवसेना आणि भाजप एकत्र होती. तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते, हे माहिती नव्हतं का? आता कुणाच्या इशाऱ्याने गडकरींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे? असा सवाल नाना पटोले यांनी केलाय. त्याचबरोबर महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार होतोय. त्यामुळे त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.
यापूर्वी भाजप आणि सेनेची युती होती. त्यावेळी गडकरींनी कधी शिवसेनेवर टीका किंवा आरोप केले नाहीत. आज मात्र ते शिवसेनेवर पत्र लिहून आरोप करत आहेत. त्यांना वरुन दाढीवाल्यानं आरोप करायला सांगितलं का? असा खोचक सवालही पटोले यांनी केलाय. महामार्गाच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार असल्याची अनेक पत्र त्यांच्या मंत्रालयाला दिली आहे. त्याची चौकशी आणि एक श्वेतपत्रिका गडकरी यांनी काढावी. महामार्गाची कामं झाली पाहिजेत. जर या कामात कुणी अडथळा आणत असेल तर त्यांना काँग्रेस विरोध करेल, असंही पटोले म्हणाले.
पटोले यांच्या नागपुरातील कार्यक्रमात नितीन राऊत पुन्हा अनुपस्थित
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूर महापालिकेवर मागील १५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसनं जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. याचाच भाग म्हणून नाना पटोले यांनी आढावा बैठका आणि कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. मात्र, दुसरीकडे नागपूर काँग्रेसमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना आता उधाण येत आहे. कारण, नाना पटोले यांच्या कार्यक्रमात पालकमंत्री नितीन राऊत यांची गैरहजेरी दिसून येत आहे.
पटोले यांच्या उपस्थितीत नागपुरात आज काँग्रेसकडून ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मंत्री सुनील केदार उपस्थित होते. मात्र, ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री नितीन राऊत यांची मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थिती पाहायला मिळाली. या कार्यक्रमात काँग्रेसकडून आज स्वातंत्र्यसेनानींचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आयोजित केलेल्या सायकल रॅलीतही नितीन राऊत उपस्थित नव्हते.