वसई-विरारमध्ये ‘मुन्नाभाई एमबीबीएस’! महापालिकेच्या माजी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक
विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या माजी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला बोगस डिग्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सुनील वाडकर असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे. वाडकर यांच्याकडे कोणतेही वैदयकीय प्रमाणपत्र नाही. या महाशयाने आपण एम.बी.बी.एस. असल्याच भासवून विरार फाटा येथे एक मोठं हॉस्पीटल उभारलं होतं. विशेष म्हणजे सुनील वाडकर आपल्याकडील बोगस प्रमाणपत्राच्या आधारे वसई विरार शहर महानगरपालिकेत २०१२ ते १४ ला ही दोन वर्षे मुख्य वैद्यकिय अधिकारी पद ही भुषवलं होतं.
बोगस एम.बी.बी.एस. डॉक्टर सुनील वाडकर यांच्याकडे कोणतेही वैद्यकिय प्रमाणपत्र महाराष्ट्र वैद्यकिय परिषद यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं नाही. या महाशयाने आपण एम.बी.बी.एस. असल्याच भासवून, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील विरार फाटा येथे एक मोठं हॉस्पिटल उभारलं. या हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन त्यांने केलं नाही. हा मुन्नाभाई एम.बी.बी.एस. बेकायदेशीररित्या या हायवे हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय प्रॅक्टिस करत होता आणि बिनधास्तपणे महाराष्ट्र शासन आणि रुग्णांची फसवणूक करत होता.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने आणि वसई तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. योजना जाधव यांनी याच्या हॉस्पिटलला अखेर सोमवारी रात्री भेट दिली. यावेळी डॉक्टरकडे वैद्यकिय व्यवसायासाठी अधिकृत पदवी प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले तर हॉस्पीटलची ही परवानगी घेतली नसल्याचे आढळून आलं. डॉ. सुनील वाडकरवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.