सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती गिरीश नानावटी यांचे निधन

मुंबई : शिखविरोधी दंगल, २००२ च्या गोध्रा हत्याकांडाची चौकशी करणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती गिरीश ठाकोरलाल नानावटी यांचे शनिवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. शनिवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
न्यायमूर्ती नानावटी यांचा जन्म १७ फेब्रवारी १९३५ ला झाला होता. त्यांनी १९५८ मध्ये बॉम्बे हायकोर्टातून वकिली सुरु केली होती. १९७९ मध्ये त्यांना गुजरात हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलेय यानंतर त्यांना १९९३ मध्ये ओडिशाच्या हायकोर्टामध्ये पाठविण्यात आले. ६ मार्च १९९५ मध्ये नानावटी हे सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती झाले. तत्पूर्वी त्यांनी ओडिशा, गुजरात, कर्नाटक उच्च न्यायालयांचे कामकाज पाहिले. १६ फेब्रुवारी २००० मध्ये ते सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती पदावरून निवृत्त झाले.
२००२ मधील दंग्यांवर नानावटी यांनी दोन भागांत अहवाल सादर केला होता. २००८ मध्ये साबरमती एक्स्प्रेस जाळपोळ प्रकरणी ५९ जणांचा मृत्यू आणि २०१४ मध्ये जाळपोळीनंतर उसळलेल्या दंगलीवर अहवाल सादर केला होता. हे अहवाल २०१९ मध्ये सार्वजनिक करण्यात आले होते. या अहवालात नानावटी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला क्लिन चिट दिली होती.




