ओएनजीसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी अलका मित्तल
मुंबई : देशातील सात महारत्न असलेल्या कंपन्यांमधील सर्वात प्रभावी आणि महत्वपूर्ण ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन कंपनीची (ओएनजीसी) धुरा पहिल्यांदा महिलेच्या हाती देण्यात आली आहे. ऊर्जा क्षेत्रातील दमदार कंपनीने तिच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी अलका मित्तल यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे महिलांचे ऊर्जा क्षेत्रातील स्थान बळकट होणार असून महिलांचा प्रत्येक क्षेत्रात वाढणारा दबदबा देशातील तरुणींसाठी अभिमानास्पद आहे.
अलका मित्तल या ओएनजीसीच्या चेअरमन असतील त्यांच्यावर व्यवस्थापकीय संचालक पदाची (सीएमडी) अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वीचे चेअरमन सुभाष कुमार ३१ डिसेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी कंपनीने मित्तल यांच्या खाद्यांवर कंपनीची जबाबदारी टाकली आहे. १२ वर्षांपूर्वी मित्तल यांनी कंपनीत मोठ्या पदावर काम केलेले आहे. भारतीय सरकारच्या महत्वपूर्ण कंपनीत महिला अध्यक्ष पदी नियुक्तीकडे मोठ्या सकारात्मकरित्या पाहिले जात आहे. सरकारने वेळेवर घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
डॉ. अलका मित्तल या उच्चशिक्षित असून त्यांच्याकडे अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी, एमबीए(मानव संसाधन), वाणिज्य शाखेतील पदवी आणि बिझनेस स्टडीमधील डॉक्टरेट आहे. कंपनीच्या वेबसाईट वरील माहितीनुसार, मित्तल यांनी १९८५ मध्ये शिकाऊ पदवीधर म्हणून कंपनीत पहिल्यांदा प्रवेश केला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्या कंपनीत मानव संसाधन प्रमुख पदी दाखल झाल्या. ओएनजीसीच्या इतिहासात या विभागाचे पूर्णवेळ संचालन करणा-या त्या पहिल्याच होत्या. कौशल्य विकास विभागाचे प्रमुख पदही त्यांनी कंपनीत भूषविले. नॅशनल अप्रेंटिसशिप योजना त्यांनीच सुरु केली होती. त्याचा फायदा देशातील तरुणांना झाला आणि चांगले मनुष्यबळ या माधम्यातून तयार झाले.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे अध्यक्ष वा चेअरमन सेवानिवृत्त होण्यापूर्वीच त्या पदी कोणची नियुक्ती करण्यात येणार आहे. याची घोषणा करण्यात येते. दोन महिन्यांपूर्वी सदर व्यक्तीच्या नावाची चर्चा करुन नाव घोषीत करण्यात येते. मात्र ओएनजीसीमध्ये गेल्या वर्षात या प्रथेला फाटा देण्यात आला आहे. सेवानिवृत्त व्यक्तीनंतर कंपनी दोन दिवस विना अध्यक्ष काम करत असल्याचे प्रकर्षाने बघायला मिळाले. हा भोंगळ कारभार यामुळ चव्हाट्यावर आला आहे.
यापूर्वीचे सीएमडी सुभाष कुमार अर्थ विभागाचे प्रमुख होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्याकडे चेअरमन आणि सीएमडी या दोन्ही पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला होता. कंपनीचे शेवटचे प्रमुख शशी शंकर हे ३१ मार्च २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांच्या जागी कोणाचीच थेट नियुक्ती करण्यात आली नव्हती. अतिरिक्त जबाबदारी खाद्यांवर टाकून कंपनीने कुमार यांच्या जागी नवीन नियुक्ती केली नव्हती. त्यांच्या निवृत्तीनंतर दोन दिवसांनी मित्तल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.