राजकारण

भारतात नसतानाही व्यापाऱ्यास अपहरणाच्या गुन्ह्यात अडकवले; परमबीर सिंग, प्रदीप शर्मां यांच्याविरोधात तक्रार

नवी मुंबई : आपण दुबईत असतानाही भारतात घडलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी अडकवल्याचा आरोप भोपाळमध्ये राहणारे व्यापारी मुनिर खान यांनी राज्य सीआयडीकडे केलेल्या तक्रारीत केले आहे. या तक्रारीमुळे परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ होण्याशी शक्यता आहे.

ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने २०१८ मध्ये क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात बुकी सोनू जालान आणि इतरांवर कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात मुनिर खान यांनाही आरोपी करण्यात आलं होतं. काही महिन्यानंतर खंडणी विरोधी पथकाने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा नंतर मोक्का कायद्यात बदलण्यात आला. परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचा दावा मुनिर खान यांनी केला आहे. या गुन्ह्यात सोनू जालान याला अटक करण्यात आली होती. अपहरणाच्या या गुन्ह्यात आरोपींवर मोक्का लावण्यात आला होता.

२२ जानेवारी २०१८ रोजी अपहरण झाल्याचं तक्रारदाराचं म्हणणं होतं. या गुन्ह्यात मुनिर खान यांनाही आरोपी करण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात ९ जानेवारी २०१८ ते २९ जानेवारी २०१८ या कालावधीत मुनिर खान हे दुबई येथे होते. ते जेव्हा अटक टाळण्यासाठी कोर्टात गेले तेव्हा कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिलं. त्याचप्रमाणे दुबईत असलेली व्यक्ती भारतात अपहरण कस करु शकते, असा प्रश्नही कोर्टाने उपस्थित केला होता.

सोनू जालान याने काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पांडे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश राज्य सीआयडी विभागाला दिले आहेत. त्यानुसार सीआयडी विभाग याची चौकशी करत आहे. तपास अधिकाऱ्यांकडे हजर राहून मुनिर खान यांनी काल सविस्तर जबाब तर दिलाच, त्याच प्रमाणे त्यांच्याकडे कसे पैसे मागण्यात आले, कोणी पैसे मागितले, कोणच्या वतीने पैसे मागितले, यात परमबीर सिंग, प्रदीप शर्मा यांची काय भूमिका होती, याबाबत सविस्तर माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button