Top Newsराजकारण

मुंबई महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराची गटारगंगा; फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कांदिवलीतून मुंबई महापालिकेबाबत आपला इशारा स्पष्ट केलाय. यावेळी फडणवीसांनी सत्ताधारी शिवसेनेवरही जोरदार हल्ला चढवलाय. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहते आहे. मुंबईला भ्रष्टाचारातून बाहेर काढायचं आहे. मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता मिळवायची आहे, असा वक्तव्य फडणवीस यांनी केलंय. तसंच आमदार अतुल भातखळकर यांचंही फडणवीसांनी यावेळी कौतुक केलं.

शिवसेना फक्त भावनिक डायलॉगबाजी करते. त्यांच्या डायलॉगबाजीला भुलू नका. निवडून आल्यानंतर ते तुम्हाला विसरतात. मुंबई महापालिकेत आपल्याला परिवर्तन करायचं आहे. राज्यात सरकार यायचं तेव्हा येईल पण आपण संघर्ष करत राहू. मात्र, २०२४ ला भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येईल, असा दावाही फडणवीसांनी यावेळी केलाय. आपलं सरकार गेल्यानंतर मेट्रोची कामं एकतर स्थगित झाली किंवा मंदगतीने सुरु आहेत. आधी आरोग्य विभागाचा पेपर फुटला आता म्हाडाचाही फुटला. एक पेपरही या राज्य सरकारला धड घेता येत नाही. आदल्या दिवशी रात्री सांगतात की परीक्षा रद्द झाली. तरुणांच्या जीवाशी खेळ सुरु आहे, असा घणाघातही फडणवीसांनी यावेळी केलाय.

कोरोना काळात प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएनं केलं. कोरोना काळातील भ्रष्टाचारावर अमित साटम यांनी पुस्तिका तयार केली आहे. अधिकारी आणि नेत्यांच्या कंपन्या रातोरात उभ्या राहिल्या. रुग्णवाहिका मिळत नव्हती म्हणून लोकांचा जीव जात होता. त्यामुळे आता आपल्याला मुंबई महापालिकेतील भ्रष्ट्राचाराची गटारगंगा स्वच्छ कराचती आहे. यांना महापालिकेत विरोधी पक्षनेता नको होता. त्यामुळे आम्ही महापालिकेत विरोधी पक्षनेता होऊ दिला नाही. विरोधी पक्षनेता नसला तरी विरोध करणं सोडलं नाही. महापालिकेतील खाल्लेला एक-एक पैसा परत काढल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच फडणवीस यांनी शिवसेनेला दिलाय.

आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आणि परीक्षेतील मोठा गैरव्यवहार आता समोर आलाय. त्यानंतर म्हाडाच्या परीक्षेचाही पेपर फुटल्याचं समोर आलंय. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री म्हाडाच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, सातत्यानं सुरु असलेल्या पेपरफुटीमुळे राज्यातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. अशावेळी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी घेतलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button