ममता बॅनर्जी ‘व्हीलचेअर’वरून करणार निवडणूक प्रचार
ममतांना ठार मारण्याचाच कट होता; तृणमूलचा आरोप
कोलकाता : नंदीग्राममधील हल्ल्यात जखमी झालेल्या आणि पायात प्लॅस्टर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण येत्या काही दिवसांतच पुन्हा प्रचारात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रसंगी व्हीलचेअरवरून प्रचार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी निवडणूक आयोगाने स्वीकारली पाहिजे. त्यांना ठार मारण्याचा कट होता, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. निवडणूक काळात राज्यातील कायदा-व्यवस्थेची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. दुसऱ्या राज्यांतून समाजकंटक नंदीग्रामला आणून हिंसाचार घडविण्याचे कारस्थान भाजपने रचल्याचा आरोपही तृणमूलच्या नेत्यांनी केला आहे.
या हल्ल्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. ममता बॅनर्जी यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्या रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांच्या डाव्या घोट्याला तसेच उजवा खांदा, हात, गळा व मानेलाही जखमा झाल्या आहेत. त्यांच्या पायाला प्लॅस्टर घातले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. बुधवारी संध्याकाळी कार्यकर्त्यांशी बोलून त्या वाहनात शिरण्याच्या बेतात असतानाच वाहनाचा दरवाजा त्यांच्या पाठीमागून ढकलण्यात आला. त्यात त्या जखमी झाल्या.
या हल्ल्याप्रकरणी तृणमूल व भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी दोन्ही पक्षांनी केली. मात्र ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करतानाच प्रदेश भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, मते मिळवण्यासाठी ममतांनी हे नाटक केले नाही ना, हे तपासायला हवे. त्यांची अशी नाटके जनतेने याआधी पाहिली आहेत. भाजपचे दोन नेते त्यांच्या या विधानानंतर ममता बॅनर्जी यांची विचारपूस करायला रुग्णालयातही गेले. राज्यपाल जगदीप धनखड यांनीही रुग्णालयात जाऊन प्रकृतीची चौकशी केली.
बॅनर्जी यांच्यावर जिथे हल्ला झाला, त्या ठिकाणी नंदीग्राम जिल्हाधिकारी विभू गोयल, पोलीस अधीक्षक प्रवीण प्रकाश व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी भेट दिली. या घटनेच्या साक्षीदारांकडून या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली आणि हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले.
नवीन पटनायक यांना चिंता
या हल्ल्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी चिंता व्यक्त केली आहे. ममता यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.