विद्यार्थ्यांचे भविष्य आणि करिअरशी खेळू नका; परीक्षा रद्दच्या निर्णयावर मुंबई हायकोर्ट नाराज
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडली. त्यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. एसएससी, आयसीएससी, सीबीएसई बोर्डाने यंदाची दहावीची परीक्षा रद्द केलीय. हा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. पुणे येथिल प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी ही याचिका दाखल केली आहे.
विद्यार्थ्यांचं भविष्य आणि करिअरशी आपण अशाप्रकारे खेळू शकत नाही. राज्यातील शिक्षण धोरणकारांना हे माहिती असायला हवं. हे मुळीच मान्य होऊ शकत नाही, अशा शब्दात उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर टीका केलीय. तसंच १० वी परीक्षेबाबत दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने सर्व बोर्डांना प्रश्न विचारलेत. तुम्ही विद्यार्थ्यांना कसं पास करणार आहात? त्यांना गुण कसे देणार आहात? या विद्यार्थ्यांची आतापर्यंत एकही परीक्षा झालेली नाही. पहिली ते आठवीची परीक्षा घेतली जात नाही. गेल्या वर्षी कोरोनामुळे नववीचीही परीक्षा घेतली नाही. त्यानंतर आता १० वीची परीक्षाही रद्द करण्यात आली. मग या विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने पास करणार आहात? असे प्रश्न उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा शिक्षण विभाग आणि बोर्डांना विचारला आहे.
Bombay High Court comes down heavily on Maharashtra Government for its decision to cancel #SSC exams for class X
“We can’t spoil career and future of our children. Framers of education policy should know that in the state. This isn’t acceptable at all” #BombayHighCourt #SSC https://t.co/PoIhaYjJcA
— Live Law (@LiveLawIndia) May 20, 2021
हायकोर्टाचे महत्वाचे प्रश्न
तुम्ही १२ वीची परीक्षा घेता मग तुम्ही १० वी ची परीक्षा का घेत नाहीत? असा प्रश्नही मुंबई उच्च न्यायालयाने विचारलाय. त्याचबरोबर सर्व बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिक्षण तज्ज्ञांशी बोलून प्रतिज्ञापत्र सादर करावं, असा आदेशही उच्च न्यायालयाने दिला आहे. हा आदेश देताना सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने नाराजीही व्यक्त केलीय. प्रत्येक वर्षी आपण विद्यार्थ्यांना प्रमोट करु शकत नाहीत. आपण शैक्षणिक दृष्ट्या मुलांचं नुकसान करु शकत नाहीत, असंही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय.
न्यायालयाचे परीक्षा मंडळाला प्रश्न
– १२ वी परीक्षा घेता येतात तर १० वी परीक्षा का नाही ?
– महाराष्ट्राची १० वी परीक्षान घेऊन शैक्षणिक भाविष्य का खराब करता ?
– महाराष्ट्र शासनाने १० वी परीक्षा रद्दचा कोणताही गांभिर्याने विचार केलेला नाही असे का ?
– १० वी परीक्षा न घेता विद्यार्थी पुढील अभ्यासक्रमास कसे प्रवेश देणार ?
– अंतर्गत परीक्षा न झालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना फुगवट्याच्या गुणांच्या आधारे विद्यार्थी कसे उत्तीर्ण करणार?