राजकारण

मुंबईतील भाजपचे सर्व नगरसेवक पूरग्रस्तांना एक महिन्याचे वेतन देणार

मुंबई: चिपळूणमधील पूरग्रस्त महिलेने आमदार आणि खासदारांचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वळवण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. या महिलेच्या मागणीची भाजपने गंभीरपणे दखल घेत मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील भाजपचे सर्व नगरसेवक एक महिन्यांचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याची घोषणा भाजपने केली आहे. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी तसे लेखी पत्र महापौर आणि महापालिका चिटणीसांना दिलं आहे.

राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. त्यात मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भ, अमरावती, सांगली इत्यादी ठिकाणी कित्येक दिवस पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले. अनेक हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. अशा प्रसंगी आपत्तीग्रस्त कुटुंबियांना उभं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे. पूरग्रस्त भागातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहेत. राज्यात कुठेही आपत्ती उद्भवल्यास भाजपच्या वतीने पुनर्वसनासाठी तातडीने मदत पोहोचवण्यात येते. या पार्श्वभूमीवर तातडीने भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त निधीस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रभाकर शिंदे यांनी दिली. त्यासंबंधीचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button