अमरावती : शहरातील राजापेठ उड्डाण पुलावरून शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला आहे. यावरुन खा. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा सधला आहे.
पुतळा हटविल्यामुळे युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. खासदार नवनीत राणादेखील चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ‘मुख्यमंत्री मुर्दाबाद, जय भवानी जय शिवाजी’ असे नारेही दिले. लोकप्रतिनिधींना महाराजांच्या पुतळ्यासाठी भांडावं लागतयं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा आणि आदर्शांचा विसर पडलाय का? अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुतळा हटविल्यानंतर, संतप्त कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याच्या घरासमोर मोठी गर्दी केली. कार्यकर्ते मात्र जोराजोरात घोषणाबाजी करत होते. घोषणाबाजी करणाऱ्या काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुतळा हटवण्याच्या घटनेचा निषेध करताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या, सदर ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, म्हणून तीन वर्षांपासून परवानगी मागण्यात येत होती. पण वेळोवेळी प्रशासनाने ती परवानगी नाकारली.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा यांनी शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. हा पुतळा महापालिकेनं हटवला आहे. आमदार रवी राणा यांनी हा पुतळा विनापरवानगी बसवला होता. तो प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला. काल रात्री राजापेठ उड्डाणपुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आणि त्यानंतर हा पुतळा हटविण्यात आला. हा पुतळा महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने काढला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. त्यामुळे बरेच राजकारण रंगले होते. यानंतर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले असून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप
जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी पुतळा हटवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर, त्यांना निवडणुकीत शिवप्रेमी जागा दाखवून देईल, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला.
महापालिका आयुक्तांच्या पुतळ्याचे दहन
राजापेठ उड्डाण पुलावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याच्या कार्यवाहीचा निषेध म्हणून स्वराज्य सामाजिक संघटनेच्यावतीने स्थानिक आयर्विन चौकात महापालिका आयुक्तांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासनाविरूद्ध जोरदार नारेबाजी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी अमोल इंगळे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
राजापेठ उड्डाणपुलावर शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी बसविण्यात आला होता. तीन वर्षांपासून तेथे शिवछत्रपतींचा पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी होती. ही मागणी शिवप्रेमी व तरुण कार्यकर्त्यांनी पूर्ण केली असा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता. गेल्या तीन दिवसांपासून तेथे शहरातील शिवप्रेमींनी मोठी उपस्थिती लावली होती. तो पुतळा कायमस्वरूपी तेथेच ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या बहाल करण्याची मागणी आमदार राणा यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती.
पालकमंत्र्यांना दोष देणे अत्यंत हास्यास्पद, माफी मागावी; काँग्रेसची मागणी
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पुतळा हटवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला. हा आरोप काँग्रेसकडून फेटाळण्यात आला आहे. काँग्रेसने मात्र यासंदर्भात भाजपकडे बोट दाखवलं आहे, अमरावती महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. असे असताना भाजपचे नगरसेवक आणि रवी राणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर पुतळा हटाव प्रकरणी टीका करीत आहेत. काँग्रेसचा याच्याशी काहीएक संबंध नाही, राणा यांनी विनाकारण पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप करू नयेत, असं स्पष्टीकरण प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी दिलं आहे. तसेच, महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपनेच हा पुतळा हटवला. मग पालकमंत्र्यांना दोष देणे अत्यंत हास्यास्पद आहे, असंही एडतकर म्हणाले.
रवी राणा आणि महापालिकेत सत्ता असलेली भाजप या प्रकरणात संपूर्णतः जबाबदार असून शिवरायांच्या अवमानाबद्दल आता रवी राणा आणि भाजपने माफी मागावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केली आहे.