मान्सूनचे केरळमध्ये ३१ मे रोजी आगमन
नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते. मात्र, मान्सूनवर यास चक्रिवादळाचा सकारत्मक परिणाम झाल्यानं यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजपूर्वी म्हणजेच ३१ मे रोजी केरळात मान्सून दाखल होईल.
बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्वेकडील भागात मान्सून गुरुवारी पोहोचला असल्याचं समोर आलं होतं. सद्यस्थितीत मान्सून मालदीव आणि कोमोरिन भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनची हीच गती कायम राहिल्यास केरळात सोमवारी म्हणजेच ३१ मे रोजी पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरवर्षी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख १ जून अशी असते. यावर्षी देखील हवामान विभागानं मान्सून दाखल होण्याची तारीख १ जून अशी सांगितली होती. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या यास चक्रिवादळामुळे मान्सून वेगानं पुढं सरकरण्यास मदत झाली आहे. त्यामुळे मान्सून एक दिवस अगोदर केरळमध्ये पोहोचेल. आणि वेळेआधीच इतर भागातही मान्सून पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे ३१ मे रोजी केरळात मान्सून दाखल होईल. त्याप्रमाणे ९-१० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.