नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि डॉ. भागवत कराड या चौघांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. यापैकी भागवत कराड सोडल्यास उरलेले तिन्ही नेते मूळचे भाजपचे नाहीत. त्यांची पार्श्वभूमी काँग्रेस, राष्ट्रवादीची राहिलेली आहे. नारायण राणे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते राज्यसभेचे खासदार आहेत. शिवसेना आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ते सातत्यानं शरसंधान साधत असतात. राणेंच्या मागे ताकद उभी करून कोकणात शिवसेनेला नामोहरम करण्याचा भाजप नेतृत्त्वाचा विचार असल्याचं बोललं जातं.
भारती पवार दिंडोरीच्या खासदार आहेत. २०१४ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र जवळपास अडीच लाख मतांनी त्या पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत कमळ हाती घेतलं. २०१९ मध्ये भाजपनं त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या धनराज महालेंचा जवळपास २ लाख मतांनी पराभव केला.
भिवंडीचे खासदार असलेल्या कपिल पाटील यांनादेखील मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनं त्यांनी लोकसभेची उमेदवारी दिली. पाटील यांनी काँग्रेस उमेदवाराचा एक लाखाहून अधिक मताधिक्क्यानं पराभव केला. यानंतर २०१९ मध्ये त्यांनी जवळपास दीड लाख मताधिक्क्यानं विजय मिळवला.
राणेंना सर्वात प्रथम शपथ
राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात नारायण राणेंना सर्वात आधी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर सर्वानंद सोनोवाल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राणे आणि सोनोवाल माजी मुख्यमंत्री असल्यानं त्यांना सर्वप्रथम शपथ दिली गेली. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याचं एक कॅबिनेट मंत्रिपद कमी झालं होतं. मात्र त्यानंतर लगेचच नारायण राणेंनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राला मिळालेली तीन कॅबिनेट मंत्रिपदं कायम आहेत. नितीन गडकरी आणि पियूष गोयल यांच्या रुपात महाराष्ट्राकडे दोन कॅबिनेट मंत्रिपदं आहेत.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे. यावरून भाजप महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं निशाणा साधत आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजातील मोठे नेते असलेल्या राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. राणे शिवसेनेला सातत्यानं लक्ष्य करत असतात. कोकणात शिवसेनेची ताकद आहे. राणेंनी मंत्रिपदाची रसद देऊन कोकणात शिवसेनेला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
शिवसेनेच्या जखमेवर मीठ
शिवसेना आणि भाजपची आता कुठल्याही क्षणी युती होईल अशी महाराष्ट्रात चर्चा असतानाच शिवसेनेचं दुखणं झालेल्या नारायण राणेंना भाजपानं केंद्रीय कॅबिनेट मंत्री केलेलं आहे. युती असतानाच नारायण राणेंच्या भाजप प्रवेशालाच सेनेनं त्यावेळेस अप्रत्यक्ष विरोध केला होता. आता दोन्हींची युती होण्याची चर्चा असतानाच राणे थेट मोदी मंत्रिमंडळात दाखल झालेत. याचा भाजप-सेनेच्या आगामी राजकारणावर थेट परिणाम होईल अशी चर्चा आहे. शिवसेनेनं नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं. बाळासाहेबांनी तो विश्वास दाखवला. पण बाळासाहेबांच्या हयातीतच राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि बाहेर पडले. उद्धव ठाकरेंची शिवसेनेत चलती सुरु झालेली होती. त्याचाच परिणाम म्हणून राणे बाहेर पडले. ते फक्त बाहेरच पडले असते तर शिवसेना नेतृत्वाला फार वाईट वाटलं नसतं. पक्ष म्हटल्यानंतर लोक येत जात राहणार. पण राणे बाहेर पडले आणि त्यांनी कधी शिवसेनेवर तर कधी ठाकरे कुटुंबावर थेट हल्ला चढवला. बाळासाहेबांचा त्यांनी आदर राखला पण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर मात्र एकेरी भाषेत हल्ले चढवले. आजही राणेंचा, त्यांच्या मुलाचा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केल्याशिवाय दिवस जात नाही. विशेष म्हणजे टिका करताना भाषेची कुठलीच मान-मर्यादा पाळलेली नसते.
राणे म्हणजे शिवसेनेची भळभळती जखम आहे.
राणे भाजपचे आधी सहयोगी नेते झाले आणि नंतर ते भाजपच्याच कोट्यातून थेट राज्यसभेवर गेले. भाजपात गेल्यावर राणेंनी शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांवरचे एकेरी भाषेतले हल्ले आणखी तीव्र केले. अशा नेत्याला केंद्रात मंत्री केल्यामुळे हे शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे. त्याची चर्चा सुरु झालीय.
ठाण्याला प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात संधी
भिवंडीतील भाजपचे खासदार कपिल पाटील यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. मुंबईत नारायण राणे यांना तर ठाणे जिल्ह्यात कपिल पाटील यांना मंत्री करण्यामागे येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला नामोहरम करण्याकरिता बळ देण्याची भाजपची रणनीती आहे. नवी मुंबई विमानतळाला शेकापचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावरून आगरी समाज आक्रमक झाला असताना पाटील यांना मंत्री करण्यामागे आगरी मतांचे ध्रुवीकरण करणे हाही हेतू स्पष्ट दिसत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचं बिगूल कधीही वाजू शकतं. आगामी काळात कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी समाजाचा विश्वास संपादन करण्यात भाजप यशस्वी होईल, ज्यामुळे या भागातील बहुसंख्य विधानसभा मतदारसंघावर त्याचा परिणाम होणार आहे.
नवी मुंबईत सध्या विमानतळाच्या नामांतराचा वाद आहे. यात कपिल पाटील यांनी लोकनेते दि बा पाटलांच्या नावाला पाठिंबा दिल्याने आता कोळी-आगरी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा डाव असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर भाजपने कपिल पाटील यांना मंत्रीपद देऊन ठाणे, पालघर जिल्ह्यात शिवसेनेच्या विरोधात आगरी समाजाचा संघर्ष अधिक करण्याची भाजपची रणनीती असल्याचे दिसून येत आहे. कपिल पाटील हे ओबीसी, आगरी समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे, ते ज्या लोकसभा क्षेत्रात आहेत त्याभागात आगरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात सेनेच्या असणाऱ्या वर्चस्वाला शह देण्याची भाजपाची खेळी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने येणाऱ्या महापालिका आणि पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर नक्कीच परिणाम होणार आहे.
चर्चा प्रीतम मुंडेंची, लॉटरी भागवत कराडांना?
मोदी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी प्रीतम मुंडेंच्या नावाची होती आणि लॉटरी मात्र भागवत कराडांना लागलीय. प्रीतम मुंडे आणि भागवत कराड दोन्ही ओबीसी, वंजारी समाजातून येतात. मंत्रिपद कुणाला द्यायचं म्हटलं तर थेट चर्चा प्रीतम मुंडेंचीच होते, झालीय. त्याला दोन कारणं. पहिलं गोपीनाथ मुंडेंची कन्या आणि दुसरं पंकजा मुंडे. त्यातही पंकजांची नाराजी दूर करण्यासाठी प्रीतम मुंडेंना केंद्रात संधी दिली जाईल अशी यावेळेस तरी जोरदार चर्चा होती पण ही पुन्हा फक्त चर्चाच ठरलीय. उलट प्रीतमला डावलून भागवत कराडांना मंत्री केल्यामुळे मुंडे भगिनी आणखी दुखावल्या जातील अशीच आता चर्चा आहे. कारण वंजारी समाज म्हणजे फक्त मुंडे भगिनींची मक्तेदारी नाही असा तर संदेश भाजपालाच द्यायचा नसेल ना? अशीही चर्चा आहे.
चर्चा पंकजांची, लॉटरी रमेश कराडांना
पंकजा मुंडेंचा विधानसभेला पराभव झाला. त्यानंतर राज्यात विधानसपरिषदेच्या निवडणुका होत्या. गोपीचंद पडळकर, रमेश कराड यांना भाजपनं आमदार केलं. त्याच वेळेस पंकजा मुंडेंनाही विधानपरिषदेवर घेतलं जाणार याची चर्चा जोरदार रंगली. पण त्यावेळेस बाजी मारली ती रमेश कराड यांनी. तेही वंजारी समाजातूनच येतात. म्हणजे चर्चा झाली ती पंकजा मुंडेंच्या नावाची पण लॉटरी लागली रमेश कराड यांना. तेच आमदार झाले. बरं ते राष्ट्रवादीत जाऊन परत आले, पडळकरांनी तर भाजपलाच भलं बुरं म्हटलेलं. त्यांना आमदार होता आलं पण पंकजा मुंडेंचा नंबर कटला तो कटलाच.