‘ मोदी है तो सब मुमकीन है ‘ अशी शेखी मिरवणाऱ्या मोदी समर्थकांवर आता दररोजच्या वाढत्या महागाईमुळे मोदी, मोदीचा नारा बासनात गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे. आगामी काळात ‘मोदी है तो महंगाई होनीही है’ असा नवा नारा देण्याची वेळ आली आहे. परिणामी या वाढत्या महागाईमुळे जनता सैरभैर झाली आहे म्हणूनच भाजपच सरकार नरेंद्र मोदीच नेस्तनाबूत करणार ही काळ्याभोर दगडावरची पांढरीशुभ्र रेघ आहे.
ऐंशीव्या ‘मन की बात’मध्ये आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमआदमी की पेट की बात केली नाही. ऐंशी महिन्यांत मोदी सरकार राजरोसपणे देशातील निम्याहून अधिक जनतेला कटोरा घेऊन भिकेला लावण्याचा एक कलमी कार्यक्रम मात्र इमानेइतबारे राबवला आहे. भाजपला देशवासीयांनी जुमला करण्यासाठी निवडून दिलेले नव्हते व नाही.
ऐंशी महिन्यांत गोरगरिबांच्या थाळीत काय घंटा दिली? मोदींनी या काळात पेट्रोल व डिझेलच्या दरात तब्बल पस्तीस ते चाळीस रूपयांची वाढ केली. पेट्रोलची दरवाढ एकवेळ समजू शकतो अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात नाही, डिझेल दरवाढीने संपूर्ण देशाचं अर्थकारण बिघडलं आहे. डिझेल दरवाढ झाली की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणाच मोडतो हे शहाण्यांना कोण सांगणार! डिझेल दरवाढीचा फटका जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीवर होता, ही वाढती भाववाढ सामान्य माणसाला खड्यात घालणारी आहे. कधीकाळी गरीबांसाठी राॅकेल मिळत होतं ते औषधालाही मिळत नाही त्यात हा मोदी गॅस! वास्तविक मोदी व शहा या रामलखन जोडीनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी कमाल पन्नास रुपये प्रति लिटर प्रमाणे डिझेलची विक्री करणे आवश्यक आहे. इतर खासगी वाहतूकदारांना हेच डिझेल सध्याच्या बाजारभावाने दिल्यास कोणाची हरकत नसावी परिणामी सर्वच स्तरातील वाढती महागाई आटोक्यात येऊ शकते.
पेट्रोल, डिझेल दररोज तीस चाळीस पैशाने वाढत आहे तर घरगुती व व्यावसायिक गॅसची दरवाढ कमालीची होत आहे. आजच्या घडीला घरगुती गॅस हजाराच्या घरात गेला आहे . साधारणपणे सामान्य माणसाला दरमहा दहा हजार जरी पगार मिळाला असं गृहीत धरले तरी त्यांने त्याच्या कुटुंबाला हातातोंडाशी हात मिळवणं किती कठीण आहे , याचा विचार भाजपचे कर्तेधरते राष्ट्रीय संघ सरसंघचालक मोहन भागवत आणि त्यांचा संघ कधी करणार आहे का नाही? का त्यांच्या स्वयंसेवकांच्या घरी सोन्याचा धूर निघतोय का?
केंद्रातील सत्ताधारी सरकारला संघ सरसंघचालक मोहन भागवत यांनी आताच वठणीवर आणण्याचा प्रयत्न करावा नाहीतर पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तीन आकडीचे संख्याबळ देखिल मिळणार नाही. केवळ हिंदू मुस्लिम करून देशाचा गाडा हाकता येणार नाही, हे कान उघडून ऐका ! काॅंग्रेसची सत्तेची मस्ती जनतेने ऐका दणक्यात जशी उतरवली तशी तुमची आपमतलबी मस्ती हीच जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. सत्तेचा माज आणि डोक्यावरचा सूर्य कधी मावळेल हे सांगता येत नाही. सामान्य माणसाला दोन वेळचे सुखाने दोन घास खाऊ द्यात! मग भले तुम्ही ‘समान नागरिक कायदा’ करा किंवा मग हिंदुस्थानला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित करा याच्याशी कोणाला काय पडलं नाही.
इकडे तुम्ही महागाई वाढवताय अन् तिकडे शासकीय व निमशासकीय कर्मचारी वर्गाला महागाई भत्त्याची खिरापत वाटताय , काय हरकत नाही पण या कर्मचारी व अधिकारी यांची संख्या आपल्या देशातील लोकसंख्येच्या तुलनेत दोन टक्के तरी आहे का ॽ उर्वरितांनी मोदी मोदी करत टाळ्या आणि थाळ्या पिटायच्या काॽ