नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सद्य:स्थितीत देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली असून, प्रमुख शहरांमध्ये डिझेलचा दरही १०० रुपये प्रतिलीटरपेक्षा जास्त झाला आहे. त्यातही काही शहरांमध्ये पेट्रोलची ११० रुपये अधिक दराने विक्री होत आहे. याच दरम्यान इंधन दरवाढीवरून विरोधक केंद्र सरकार जोरदार हल्लाबोल करत आहेत. याच दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मोदी सरकारने जनतेला दिवाळी भेट म्हणून ही महागाई दिली आहे” असं म्हणत निशाणा साधला आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतीत विक्रमी वाढ केल्याबद्दल कायम स्मरणात राहील. नरेंद्र मोदी सरकारने जनतेला दिवाळी भेट म्हणून महागाई दिल्याचे दिसते” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. तसेच “पेट्रोल, डिझेल, एलपीजी, खाद्यतेल आणि भाज्यांच्या किमती ज्या प्रकारे वाढत आहेत, ते पाहता मोदी सरकारने जनतेला महागाईची दिवाळी भेट दिली आहे. आधीची सरकारे सणांच्या आधी महागाई कमी करण्याचा प्रयत्न करत असत, जेणेकरून सर्वसामान्यांना सण आनंदाने साजरा करता यावा, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
अशोक गेहलोत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “दिवाळीच्या फक्त तीन दिवस आधी, मोदी सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती २६६ रुपयांनी वाढवून मिठाई महाग करण्याची व्यवस्था केली आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटर ११६ रुपये आणि डिझेलचे दर प्रतिलिटर १०८ रुपये झाले आहेत, तर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दर एका वर्षात ५९८ रुपयांवरून ३०६ रुपयांनी वाढले असून ९०३ रुपयांपर्यंत गेले आहेत” असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच आमच्या सरकारने गुणवंत विद्यार्थिनींना महाविद्यालयात जाण्यासाठी स्कूटीचे वाटप केले, पण मुली मोदी सरकारला विचारत आहेत की एवढे महाग पेट्रोल कसे विकत घ्यायचे? असंही गेहलोत म्हणाले.