राजकारण

आंतरराष्ट्रीय मदत देण्यातही मोदी सरकारकडून महाराष्ट्राशी दुजाभाव : सचिन सावंत

मुंबई : कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असताना भारताला जगभरातील ४० देशांकडून मदत पुरवण्यात येत आहे. केंद्रातले मोदी सरकार ती मदत केवळ भाजप शासित राज्यांना देत असून महाराष्ट्राशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. या प्रकरणी राज्यातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सचिन सावंत यांनी एका गुजराती वृत्तपत्रातील आलेल्या माहितीच्या हवाल्याने मोदी सरकारवर आरोप केला आहे. ते म्हणतात की, “40 देशांच्या आंतरराष्ट्रीय मदतीतही मोदी सरकार महाराष्ट्राशी भेदभाव करत आहे. प्रथम ते या मदत सामुग्रीवर बसून राहिले. वितरण सुरू केले तेव्हा महाराष्ट्र या यादीत नाही. भाजपा शासित युपी, बिहार, एमपी, हरियाणा, गुजरात इत्यादी राज्ये त्या यादीत आहेत. आता देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं. मोदी सरकारचा जाहीर निषेध.”

सचिन सावंत पुढे म्हणतात की, “सदर आंतरराष्ट्रीय मदतीवर राज्य सरकारांचाही हक्क असताना ती थेट राज्यांना का दिली जात नाही? केवळ केंद्रीय यंत्रणांकडून त्याचे होणारे वाटप हे #PMCares प्रमाणे मोदींच्या हातात अमर्याद अधिकार देणारे आहे, तसेच ते संघराज्य पध्दतीला छेद देणारे ही आहे.” काँग्रेसच्या आरोपाला आता राज्यातील आणि केंद्रातील भाजप नेते काय उत्तर देतात हे पहावं लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button