राजकारणशिक्षण

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलताच संताप आणि उद्रेक; पुणे, जळगाव, नागपुरात विद्यार्थी रस्त्यावर

पुण्यात पोलिसांचा सौम्य लाठीमार

मुंबई : राज्य सरकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलताच (MPSC) विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यात ठिकठिकाणी सरकारच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. पुणे, कोल्हापूर, जळगाव अशा शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

महाराष्ट्रात कोरोचा संसर्ग पुन्हा धुमाकूळ घालत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक १४ मार्च, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० घेण्यात येणार होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याचे प्रसिद्धी पत्रक लोकसेवा आयोगाच्या सहसचिवांनी जारी केले आहे. या पत्राकात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक १४ मार्च, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ‘च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक १० मार्च, २०२१ रोजीच्या पत्राद्रारे आयोगास खालीलप्रमाणे कळविण्यात आले आहे. राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निबंध लावेलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. शासनाकडून घेण्यात आलेल्या उपरोक्‍त निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही पुढे ढकलण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेचा सुधारित दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल. असे म्हटले आहे.

सरकारने हा निर्णय जाहीर करताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कित्येक वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्ष भाजपनेही विद्यार्थ्यांच्या भवितव्याला वेठीस धरणे योग्य नसल्याचे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांत एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

पुण्यात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर, पोलिसांचा सौम्य लाठीमार

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 14 मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतला आहे. तसं परिपत्रक आयोगानं काढलं आहे. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या निर्णयामुळे पुण्यात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. सरकारनं MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही वेळातच शेकडो विद्यार्थी पुण्यातील शास्त्री रोडवर जमले. त्यावेळी विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला.
ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी वर्षानुवर्षे या परीक्षेची तयारी करतात. पुण्यासारख्या ठिकाणी मोठं आर्थिक नुकसान सहन करत ते परीक्षेची तयारी करत असतात. मात्र, अवघ्या दोन दिवसांवर परीक्षा आली असताना सरकार कुठलीही पूर्वकल्पना न देता परीक्षा रद्द करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सरकार आमच्या भविष्याशी का खेळत आहेत? असा सवालही विद्यार्थ्यांनी विचारला आहे.

कोल्हापुरात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे पडसाद कोल्हापुरातही उमटले. कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी सरकारच्या या धोरणाचा निषेध केला. तसेच, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहरातील सायबर चौकात एकत्र येऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस आणि विद्यार्थी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या प्रकारमुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

जळगावात विद्यार्थ्यांचा रास्तारोको

राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकल्यामुळे जळगावातील विद्यार्थ्यांनीही संताप व्यक्त केला. येथे विद्यार्थ्यांनी कोर्ट चौकात जमत रास्ता रोको केला. यावेळी 250 ते 300 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे येथील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

नागपूर, सांगलीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संताप

सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. सरकारच्या या निर्णयाचे पडसाद नागपूर आणि सांगलीमध्ये उमटले. नागपुरात सक्करदरा चौकात जमून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर सांगलीमध्येसुद्धा विधार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विध्यार्थी आणि विद्यार्थीनी अपस्थित होत्या.

वडेट्टीवार आणि मेटे आमने-सामने

या विषयावर आता जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि मंत्री विजय वडेट्टीवार हे या विषयावर आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांनी सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं. आहे. महाराष्ट्र सरकारनं सध्या राज्यात कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन आणि सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा जो विषय प्रलंबित आहे, त्याचा विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय योग्य आहे. काही लोकांना तो निर्णय पसंत नसेल, त्यांच्या काही प्रतिक्रिया आल्या असतील किंवा येत असतील, पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की परीक्षा फक्त पुढे ढकलल्या आहेत, रद्द केलेल्या नाहीत. कोरोनाच्या परिस्थितीत अशा पद्धतीनं गोंधळ घालणंही योग्य नाही. पुढे लाखो विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यांच्या जिवाला जर काही बरं वाईट झालं तर हे गोंधळ घालणारे जबाबदारी घेणार आहेत का? असा सवाल विनायक मेटे यांनी केलाय.

मेटेंकडून आगीत तेल ओतण्याचे काम – वडेट्टीवार
विनायक मेटे यांच्या या मताचा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतलाय. “विनायक मेटे हे आगीत तेल घालण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या 2- 3 वर्षांपासून 80 टक्के विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की, यावर मार्ग काढा, तोडगा काढा. आरक्षित जागा बाजूला ठेवून परीक्षा घेण्यास काहीच हरकत नाही”, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. त्याचबरोबर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

सरकारला घरचा आहेर

“एमपीएससीची परीक्षा अचनाकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीनं अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहिजे”, अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी आयोगाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा : फडणवीस

एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे वर्षानुवर्षे त्यासाठी तयारी करणार्‍या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button