मुंबई : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पालघरमध्ये मनसे आणि भाजपची युती पाहण्यास मिळाली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सुद्धा मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा रंगली आहे. अशातच दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं एकमेकांच्या घरी येणे जाणे वाढले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज बोलावण्यात आली आहे. या बैठकीआधी बाळा नांदगावकर हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आशिष शेलार देखील आधीपासूनच उपस्थित होते. फडणवीसांची भेट घेऊन आल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
मी माझ्या वैयक्तिक कामासाठीच आलो होतो. फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. राज ठाकरे यांनीच फोन केला होता, त्यामुळे भेटण्यासाठी वेळ दिला होता. दोन राजकारणी एकत्र भेटले तर राजकीय चर्चा होते असते, असंही नांदगावकर म्हणाले.
तसंच, आर्यन खान अटक प्रकरणावरून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याची माहिती समोर आली आहे, हे योग्य नाही, अस मतही बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर मसने आणि भाजपमध्ये हालचालींना वेग आला. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत मनसे आणि भाजपने एकत्र लढवली होती. त्यामुळे महापालिकाच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येणार का अशी चर्चा रंगली आहे.