मुंबई : ‘मिस्टर इंडिया’ विजेता बॉडी बिल़्डर मनोज पाटीलने मुंबईमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत अभिनेता साहिल खानवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. साहिल खानवर सायबर बुलिंग आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनोजला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मनोज पाटीलला रात्री उशिरा त्याच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. त्याने गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपासून साहिल खान त्याला त्रास देत असल्याचा आरोप मनोजने केला होता. मानसिक त्रास आणि बदनामीमुळे मी आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले होते. मिस्टर इंडिया झालेल्या मनोजने मिस्टर ऑलंपियासाठी तयारी सुरु केली होती. साहिल खान देखील या स्पर्धेत भाग घेऊ इच्छित होता. यामुळे आपल्याला त्यापासून दूर करण्यासाठी व मिस्टर ऑलंपिया स्पर्धेत भाग न घेण्यासाठी साहिल त्रास देत होता, असा आरोप मनोजने केला आहे. मनोज पाटीलच्या कुटुंबीयांनी ओशिवारा पोलिस ठाण्यात साहिल विरोधात तक्रार दाखल केली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे देखील ते मदतीची मागणी करणार असल्याचे सांगितले जात आहे.