Top Newsफोकस

युद्ध थांबविण्यासाठी तुर्कीच्या राष्ट्रपतींची मध्यस्थीची तयारी, मात्र पुतिन यांच्या अटी !

मास्को : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धाचा परिणाम काय होईल? या विचाराने संपूर्ण जग चिंतित आहे. यातच, युद्धाच्या ११ व्या दिवशी रविवारी तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. तुर्कीच्या राष्ट्रपती कार्यालयाने म्हटले आहे की, एर्दोगन यांनी रशियाच्या राष्ट्रपतींसोबत झालेल्या संभाषणात तत्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे. सुमारे तासभर चाललेल्या या फोन कॉलमध्ये एर्दोन म्हणाले, युक्रेनमधील मानवी संकट पाहता रशियाने काही काळासाठी युद्ध थांबवायला हवे. तसेच, संघर्ष संपविण्यासाठी युद्धाऐवजी राजकीय तोडगा काढायला हवा, असे आवाहनही एर्दोगन यांनी पुतिन यांना केले आहे.

तुर्कीचे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. सध्याच्या युद्ध स्थितीत मध्यस्थ बनून शांतता प्रस्थापित करण्याचे श्रेय घेण्याचा तुर्कीचा इरादा आहे. एवढेच नाही, तर त्यांनी पुढील आठवड्यात दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आमंत्रितही केले आहे. तसे यावेळी चर्चेदरम्यान, हे संकट संपविण्यासाठी आपण आपल्या बाजूने सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत, असेही एर्दोगन यांनी म्हटले आहे.

चर्चेदरम्यान पुतिन यांनी एर्दोगन यांना युद्धविरामासाठी रशियाच्या अटी सांगितल्या. तसेच, जोवर युक्रेन या अटी मान्य करत नाही, तोपर्यंत युद्ध थांबणार नाही, असेही पुतिन यांनी म्हटले आहे. यात, युक्रेनच्या जागतिक घडामोडींपासून तटस्थ रहण्याचा आणि युक्रेनच्या निशस्त्रीकरणाच्या मुद्याचा समावेश आहे. याशिवाय, रशिया आपले लक्ष्य साध्य केल्याशिवाय थांबणार नाही, असेही पुतिन यांनी स्पष्ट केले आहे.

रशियाविरोधी देशांवर कठोर कारवाईच्या विचारात व्लादिमीर पुतीन

युक्रेनविरोधातील आपले आक्रमण रशियाने अधिकच तीव्र केले आहे. दरम्यान, युक्रेन युद्धात रशियाविरोधात भूमिका घेणाऱ्या देशांविरोधात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन कठोर कारवाई करण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे. तसेच अशा देशांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहे. त्यासाठी पुतीन यांनी एका विशेष ऑर्डरवर स्वाक्षरी केली आहे. ८ मार्चपासून रशियामधून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. प्रवासी आणि मालवाहू विमानांची सेवा रोखण्याचे आदेश दिले आहेत. पाश्चात्य देशांकडून लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सध्या अझरबैजान, अर्मेनिया, कझाकिस्तान, कतर, यूएई आणि तुर्कीच्या मार्गातून रशियन नागरिक माघारी परतत आहेत.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इशारा देताना सांगितले की, युक्रेनचा देशाचा दर्जा धोक्यात आले. तसेच पाश्चात्य देशांकडून लावण्यात आलेले निर्बंध म्हणजे रशियाविरोधात करण्यात आलेल्या युद्धाची घोषणा आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच ताब्यात आलेल्या मारियुपोलमध्ये दहशतवादी कारवायांमुळे शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे,

यादरम्यान युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की, शनिवारी रशियन सैन्याने मरियुपोलमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक केली. रशियन सैन्य किव्ह आणि उत्तरेकडील चेरनीहीव्हमधील निवासी भागात शक्तिशाली बॉम्ब टाकत आहे. दरम्यान पुतीन यांनी सांगितले की, युक्रेन जे काही करत आहे, ते त्यांनी सुरू ठेवले तर मी युक्रेनच्या देश म्हणून असलेल्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे आवाहन करेन.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवणाऱ्या आणि रशियाचे चलन कमकुवत करण्यासाठी लावण्यात येत असलेल्या निर्बधांवरून पाश्चात्य देशांवर टीका केली आहे. पुतीन यांनी रशियन विमान कंपनी एअरोफ्लोटच्या फ्लाइट अटेंडंटसोबत झालेल्या बैठकीत सांगितले की, लावण्यात येत असलेले निर्बंध हे युद्धाच्या घोषणेप्रमाणे आहेत. तसेट युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दावा केला की, रशियन तोफखाना आणि विमानांनी बॉम्फफेक करून बाहेर जात असलेल्या लोकांना अडथळा निर्माण केला. दरम्यान, युद्धकाळात रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये दोन फेऱ्यांमधील चर्चा झाली आहे. आता दोन्ही देशांमध्ये तिसऱ्या फेरीतील चर्चा ही सोमवारी होणार आहे.

पुतीन यांची नाटोला थेट धमकी

दोन शहरांमधून लोकांना बाहेर पडण्याची संधी देत रशियाने सात तासांची शस्त्रसंधी जाहीर केली होती. त्यानंतर पुन्हा युक्रेनवर जोरदार हल्ले सुरु झाले आहेत. याच दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अवघ्या युरोपला उघड धमकी दिली आहे. जर युक्रेनचे आकाश नो फ्लाय झोन म्हणून घोषित केले तर रशिया युरोपवर हल्ला करेल, असा थेट इशाराच दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

युक्रेनमध्ये नो फ्लाय झोन घोषित करण्याची मागणी होऊ लागली होती. त्यावर नाटो आणि अमेरिकेने असे करण्यास नकार दिला होता. यावरून राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनवर (नाटो) कडाडून टीका केली आहे. तसं न करता आता पाश्चात्य लष्करी आघाडीने रशियन हल्ल्यांना ग्रीन सिग्नल दिला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युरोपवरच हल्ला करण्याची धमकी दिली आहे. युक्रेनमध्ये नो फ्लाय झोनची घोषणा म्हणजे युद्धाची घोषणा समजली जाईल, असे पुतीन म्हणाले. जर ते हेच करत राहिले तर भविष्यात युक्रेनचा स्वतंत्र देश असण्याचा दर्जा धोक्यात येईल. आमच्यावर जे प्रतिबंध लावण्यात आले आहेत ते युद्धाची घोषणा केल्यासारखेच आहेत, असेही पुतीन म्हणाले.

अंतर्गत विरोधाला सामोरं जाणाऱ्या पुतीन यांनी उघडली तिजोरी!

रशिया-युक्रेन युद्धात दोन्ही देशांकडून परस्परांचे हजारो सैनिक मारल्याचा दावा करण्यात आला आहे. युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचा आकडा हजारोंच्या घरात असला तरी त्याचा नेमका आणि अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्धाच्या ११ व्या दिवशी शहीद जवानांसाठी मोठी घोषणा केली आहे. युक्रेन विरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा पुतीन यांनी केली आहे. युद्धात शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या कुटुंबीयांना ५ मिलियन रुबल (४० लाख रुपये) आणि जखमी जवानांसाठी ३ मिलियन रुबल (२४ लाख रुपये) आर्थिक मदत म्हणून जाहीर केले आहेत.

अल-जजीराच्या रिपोर्टनुसार रशियन संरक्षण मंत्रालयाकडून युद्धात मृत्यूमुखी पडलेल्यांची पहिली आकडेवारी समोर आली आहे. यातील नोंदीनुसार रशियाचे आतापर्यंत ४९८ सैनिक मारले गेले आहेत. तर १,५९७ सैनिक जखमी झाली आहे. काही दिवसांपूर्वी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेनकोव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक अशी सर्व आर्थिक मदत केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. त्यांनी रशियानं युक्रेनच्या २,८७० हून अधिक सैनिक मारल्याचा दावा केला होता. तर ३,७०० सैनिक जखमी झाल्याचं ते म्हणाले होते. याशिवाय ५७२ सैनिकांना ताब्यात घेतल्याचीही माहिती त्यांनी दिली होती. दरम्यान, युक्रेननं रशियाचे कमीत कमी ४,५०० सैनिक मारल्याचा दावा केला आहे.

रशियानं युक्रेन विरोधात युद्धाची घोषणा केल्यानंतर तातडीनं हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात आली होती. या संघर्षात रशियानं सुरुवातीला ६३ हजाराहून अधिक सैनिक तैनात केले होते. दरम्यान, युद्धात रशियाचे नेमके किती सैनिक मारले गेले याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही.

युक्रेन दरमहा देणार २.५० लाख रुपये

रशियानं हल्ला सुरू केल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी आपल्या सैनिकांना दरमहा १,००,००० रिव्निया (युक्रेनी चलन) अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. युक्रेनी लष्कराला मजबूत करण्यासाठी आवश्यक असे सर्व प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले होते.

युद्धविराम, तरी रशियाचे हल्ले सुरु; जेलेन्स्कींचा आरोप

युद्धाच्या दहाव्या दिवशी युक्रेनमधील मारियुपोल, वोल्नोवाखा या दोन शहरांमध्ये रशियातर्फे शनिवारी सात तासांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला होता. मात्र रशियाकडून काही भागात गोळीबार सुरू राहिल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम थांबविण्यात आले, असा दावा युक्रेनने केला. तिथे अडकलेल्यांमध्ये शेकडो भारतीय आहेत.

मारियुपोल, वोल्नोवाखा या दोन शहरांमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजल्यापासून युद्धविरामाला प्रारंभ झाला. युक्रेनच्या युद्धग्रस्त भागांत अडकलेले भारतीय व अन्य नागरिकांना सुरक्षित ठिकाणी निघून जाण्यासाठी मदत करायला आम्ही तयार आहोत, असे रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत नुकतेच सांगितले होते. या कामासाठी रशिया, युक्रेनने युद्धविराम घ्यावा, अशी मागणी भारताने केली होती. रशिया व युक्रेनने युद्धविराम केल्यास सुमी व इतर शहरांतून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी वेगाने प्रयत्न करता येतील असे भारताने म्हटले. सुमी व पिसोचिन येथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी जिथे आश्रय घेतला आहे तिथेच राहावे. धोका पत्करू नये. या विद्यार्थ्यांची सुटका करण्याचे प्रयत्न जारी असल्याचे परराष्ट्र खात्याने म्हटले.

आम्हाला विमाने द्या…अन्यथा जमिनीवर रक्तपात वाढेल, युक्रेनची पाश्चिमात्य देशांना विनंती

मागील ११ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. आतापर्यंतची परिस्थिती पाहता रशिया युक्रेनवर भारी पडत असल्याचे दिसत आहे. यातच आता युक्रेनने पाश्चिमात्य देशांकडे युद्धासाठी शस्त्रे पुरवण्याणी विनंती केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पाश्चात्य राष्ट्रांकडे रशियन बनावटीची विमाने उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हवेत लढाई लढण्यासाठी विमाने न मिळाल्यास जमिनीवर रक्तपात वाढेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे.

यूएस सिनेटचे नेते चक शूमर यांनी सांगितले की, झेलेन्स्की यांनी शनिवारी यूएस सिनेटर्सशी बोलताना विशेष आवाहन केले. “रशियाला हरवण्यासाठी युक्रेनला रशियन बनावटीच्या विमानांची नितांत गरज आहे. मी त्यांचे हस्तांतरण सुलभ करण्यासाठी सर्वतोपरी मदत करेन,”असेही शुमर यांनी निवेदनात म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button