मुंबई इंडियन्सला चुकांचा फटका; दिल्ली कॅपिटल्सकडून ६ गडी राखून पराभव
चेन्नई : मुंबई इंडियन्सच्या चिंतेत आता चांगलीच भर पडली आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या संघाकडून सातत्याने मोठ्या चुका होत आहेत आणि त्यामुळेच त्यांना दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इंडियन्सवर ६ गडी राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १३८ धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीने हे विजयी आव्हान ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं आहे. दिल्लीकडून ‘गब्बर’ शिखर धवनने सर्वाधिक ४५ धावा, तर स्टीव्ह स्मिथने ३३ धावांची खेळी केली. मुंबईकडून जयंत यादव, कायरन पोलार्ड, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १ गडी बाद केला.
अमित मिश्रा आणि शिखर धवन ही जोडी दिल्लीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. अमित मिश्राने ४ ओव्हर्समध्ये २४ धावा देत ४विकेट्स घेतल्या. तसेच शिखर धवनने ४२ चेंडूत ५चौकार आणि १ सिक्ससह ४५ धावा केल्या. दिल्लीने मुंबई विरुद्धच्या ५ सामन्यानंतर विजय मिळवला आहे. याआधीच्या ५ सामन्यात मुंबईने दिल्लीवर ५ सामन्यांमध्ये मात केली होती.
या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीला धक्का देत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. आजच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा तिसऱ्या स्थानावर होता. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यावर दिल्ली कॅपिटल्सचे सहा गुण झाले आहेत. आरसीबीचेही सहा गुण असले तरी त्यांचा रनरेट हा दिल्लीच्या संघापेक्षा जास्त आहे, त्यामुळे सहा गुण असूनही त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. पण या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचे गुणतालिकेत नुकसान झाले आहे. त्यांना आपले चौथे स्थान गमवावे लागले नसले तरी त्यांची रनरेट मात्र फारच कमी झाला आहे. याचा फटका त्यांना प्ले-ऑफध्ये पोहोचण्यापूर्वी बसू शकतो.
मुंबई इंडियन्सचे १३८ धावांचे आव्हान माफक वाटत होते. पण यावेळी दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. पृथ्वी शॉ याला जयंत यादवने बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वीला यावेळी सात धावा करता आल्या. पृथ्वी बाद झाला असला तरी त्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि शिखर धवन यांच्यामध्ये चांगली भागीदारी झाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावा जोडल्या. पण कायरन पोलार्डने यावेळी स्मिथला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला. स्मिथने ३३ धावा केल्या. स्मिथ बाद झाल्यावर शिखर धवनने चांगली फटकेबाजी केली, पण त्याचे अर्धशतक यावेळी पाच धावांनी हुकले. धवनने ४२ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४५ धावा केल्या. पण त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि ललित यादव यांनी अखेरच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सला क्विंटन डीकॉकच्या रुपात पहिला धक्का बसला. डीकॉकला यावेळी फक्त एकच धाव करता आली. पण त्यानंतर मात्र मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार फलंदाजी केली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमारला यावेळी ३४ धावा करता आल्या. सूर्यकुमार बाद झाल्यावर रोहितने काही काळ फलंदाजी केली खरी, पण त्याला यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहितने यावेळी यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावा केल्या, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. दिल्लीचा फिरकीपटू अमित मिश्राने यावेळी रोहित शर्माला बाद केले. रोहितने यावेळी ३० चेंडूंत ३ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४४ धावा केल्या. अमित मिश्राने याच नवव्या षटकात रोहितनंतर हार्दिक पंड्यालाही बाद केले. यावेळी हार्दिकला भोपळाही फोडता आला नाही. हार्दिकनंतर कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डही लवकर बाद झाले आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची ६ बाद ८४ अशी अवस्था झाली. पण त्यानंतर जयंत यादव आणि इशान किशन यांनी चांगली भागीदारी केल्यामुळे मुंबई इंडियन्सला १३७ धावा करता आल्या.
मोठ्या चुकांचा मुंबई इंडियन्सला फटका
मुंबई इंडियन्सला आतापर्यंत चांगली सुरुवात मिळालेली नाही. त्याचबरोबर क्विंटन डीकॉक आणि रोहित शर्मा यांना आतापर्यंत चांगली सलामी देता आलेली नाही. हीच मुंबईसाठी मोठी चिंतेची बाब आहे. मुंबईच्या डावाच्या सुरुवातीलाच त्यांना आतापर्यंत धक्का बसत आला आहे. त्यामुळेच त्यांना मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. रोहित शर्माला आतापर्यंत मोठी खेळी साकारता आलेली नाही. त्याचबरोबर स्थिरस्थावर झाल्यावर रोहित बाद होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. रोहितने आजच्या सामन्यात या हंगामातील सर्वाधिक ४४ धावा केल्या खऱ्या, पण रोहितला अजूनही अर्धशतकी खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे मुंबईसाठी ही चिंतेची बाब आहे. जर मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर रोहितने चुक सुधारून मोठी खेळी साकारणे गरजेचे आहे.
मधल्या फळीतील फलंदाजी ही मुंबईसाठी फार मोठी डोकेदुखी ठरली आहे. खास करून हार्दिक आणि कृणाल या पंड्या बंधूंना आतापर्यंत एकाही सामन्यात चांगली फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळेच मुंबई इंडियन्स आतापर्यंत मोठी धावसंख्या गाठू शकलेला नाही. कायरन पोलार्डने गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती खरी, पण त्याला आजच्या सामन्यात मोठी खेळी साकारण्यात अपयश आहे. इशान किशनही आतापर्यंत अपयशी ठरत आलेला आहे. आजच्या सामन्यात इशान जास्त काळ खेळपट्टीवर थांबला खरा, पण त्याला ट्वेन्टी-२० क्रिकेटला साजेशी फलंदाजी करता आली नाही. आजच्या सामन्यात इशान किशनने २८ चेंडूंत २६ धावा केल्या. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये एवढी संयमी फलंदाजी करुन चालत नाही.
मुंबई इंडियन्सची गोलंदाजी चांगली होत आहे. पण त्यांची फलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. यामध्ये सुधारणा झाली तरच मुंबई इंडियन्स विजय मिळवू शकते. पण या चुका सुधारल्या गेल्या नाहीत तर मुंबई इंडियन्सचा संघाला प्ले-ऑफमध्ये पोहोचणे कठीण होऊन बसू शकते.