अर्थ-उद्योग

मुथूट समुहाचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे निधन

नवी दिल्ली : मुथूट ग्रुपचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. ‘मुथूट ग्रुप’मधील ‘मुथूट फायनान्स’ ही देशातील सर्वात मोठी नॉन-बँकिंग गोल्ड लोन वित्तीय कंपनी आहे.

एमजी जॉर्ज मुथूट हे मुथूट समूहाचे अध्यक्षपद भूषवणारे कुटुंबातील तिसर्‍या पिढीचे सदस्य होते. 1939 मध्ये केरळात मुथूट कंपनीची स्थापना झाली. एमजी जॉर्ज मुथूट यांनी 1979 मध्ये वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून धुरा हाती घेतली. तर 1993 मध्ये त्यांनी मुथूट समूहाचे अध्यक्षपद स्वीकारलं.

गेल्या वर्षी फोर्ब्ज मासिकातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांनी स्थान मिळवले होते. या यादीत नाव आलेल्या सहा मल्याळी व्यक्तींपैकी जॉर्ज मुथूट एक होते. एमजी जॉर्ज मुथूट यांच्या नेतृत्वात मुथूट ग्रुपने जगभरात 5000 हून अधिक शाखा आणि 20 पेक्षा जास्त वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये विस्तार केला.

एमजी जॉर्ज यांच्या नेतृत्वात, समूहाची अग्रणी असलेली मुथूत फायनान्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी सुवर्णकर्ज कंपनी झाली. कंपनीचे बाजार भांडवल 51 हजार कोटींपेक्षा जास्त असून एकूण उत्पन्न 8 हजार 722 कोटी रुपये आहे. एमजी जॉर्ज मुथूट हे केरळातील ऑर्थोडॉक्स चर्चचे विश्वस्त होते. याशिवाय ते फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य होते. एवढेच नव्हे तर जॉर्ज मुथूट हे केरळ राज्य परिषदेचे अध्यक्षही होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button