मेघालयच्या आमदाराचे कोरोनामुळे निधन
![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/09/sk-sunn.jpg)
शिलाँग : कोरोनाची लस घेणे किती फायद्याचे आहे, हे लस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास कळते. मेघालयच्या अपक्ष आमदाराला कोरोना लस न घेतल्याने जिवाला मुकावे लागले आहे. आमदार सिंटार क्लास सुन यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
सिंटार यांची कोरोनामुळे तब्येत खालावत चालली होती. मावंगपमध्ये त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृत्यू झाला. विधानसभेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सिंटार यांनी एकही कोरोनाची लस घेतली नव्हती. राज्यात असे सात आमदार आहेत, ज्यांनी अद्याप एकही लस घेतलेली नाही. सिंटार हे विधानसभेतील पर्यावरण समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय फुटबॉलपटू यूजीनसन लिंगदोहचे वडील होते. २०१६ मध्ये ते राज्याच्या पीएचईतून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. २०१८ मध्ये ते मावफलांग मतारसंघातून विधानसभेवर गेले होते. मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी सिंटार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मेघालय विधानसभेच्या ५ आमदारांचे २०१८ पासून निधन झाले आहे. २०१८ मध्ये काँग्रेस आमदार क्लेमेंट मारक, २०१९ मध्ये अध्यक्ष डोनकुपर रॉय, डेविड ए नोंग्रुम यांचे यंदा २ फेब्रुवारी आणि डॉ आजाद जमान यांचे ४ मार्चला निधन झाले होते.