Top Newsराजकारण

मराठी भाषेचा स्वाभिमान जपायला हवा : शरद पवार

९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप

कुसुमाग्रजनगरी (भुजबळ नॉलेज सिटी) नाशिक : मराठी भाषेचा स्वाभिमान आपण जपायला हवा. त्यासाठी मराठी मन घडवावे, भाषा संपली तर आपली अस्मिता देखील नष्ट होईल, असा इशारा ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी विशेष अतिथी म्हणून बोलताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिला.

नाशिक येथे सुरू असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. समारोप कार्यक्रमात निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, नाशिकचे निमंत्रक जयप्रकाश जतेगावकर उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चाच होऊ शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य अजरामर आहे, असे पवारांनी स्पष्टपणे नमूद केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या सोहळ्यात बोलताना शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चाच होऊ शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य अजरामर आहे. वीर सावरकर हे विज्ञानवादी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाला विरोध कोण करूच शकत नाही. यावर होत असलेल्या चर्चा चुकीच्या असून, अशा चर्चा होणे योग्य नाही, असे शरद पवार यांनी नमूद केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसराला कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले आहे. ते अगदी योग्य आहे. अलीकडेच राज्याच्या मुख्य सचिवांना भेटलो होतो. ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत. मराठी भाषा विषयक अडचणी समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी एकत्र बसून चर्चा करायचे ठरवले आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

समाजमाध्यमांत मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करण्याचे आवाहन करून शालेय शिक्षणासाठी इंग्रजीला प्रधान्य दिले जाते, महाविद्यालयिन शिक्षणात देखील मराठीतून शिक्षण देण्याचा विचार व्हावा. पाठ्यपुस्तकांच्या रचनेत आधुनिकता आणण्यासाठी सातत्याने काम करणं आवश्यक आहे. बहुजनांच्या भाषेला बोली भाषेला साहित्यात व मराठी कोशात अधिक स्थान द्यायला हवे. प्रमाण भाषेबद्दल दुराग्रह सोडून सर्व शैलींना स्थान द्यावे असे आवाहन त्यांनी ,केले.

दरम्यान, निवृत्ती न्या. नरेंद्र चपळगावकर म्हणाले की, नाशिक म्हटलं की मला कवी गोविंद, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुसुमाग्रज आठवतात. राज्य सरकार म्हणतेय की, दहावीपर्यंत मराठी शिकण्याची सक्ती करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, ही घोषणा लवकरात लवकर अमलात आणली, तर खूप बरे होईल, अशी अपेक्षा न्या. चपळगावकर यांनी व्यक्त केली.

काही लोकांना द्राक्ष आंबट, पण नाशिकची आंबट नाहीत; भुजबळांचा फडणवीसांना टोला

समारोपाच्या भाषणावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी शहराबाहेर असलेल्या या जागी संमेलन घेण्याचा निर्णय घेणाऱ्या महामंडळाचे आभार मानले आहेत. तसेच ग्रंथदिंडीला आलेल्या महापौरांचे देखील आभार मानले. संमेलन कसं होणार? काय होणार? अशा अनेक विषयांची मीडियात चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं. भाषा, लेखक, लोकशाही, शेतकरी, आंदोलनं, माध्यमातील मनोरंजन, बालसाहित्य यासह अनेक विषयांवर परिसंवाद झाले.

निमंत्रित कवी ५२, गझलकार १८९, कवी ११५ तर कविकट्ट्यावर ५८७ अनिमंत्रीत कवींनी सहभाग घेतला. कुसुमाग्रज नगरी नाव देण्याचं ठरलं होतं. या नावाला का विरोध व्हावा?स्वातंत्र्यवीर सावरकर हे आम्हा सगळ्यांचे, स्वातंत्र्यसूर्य असा उल्लेख का नाही आवडला? तरीही आदर्शाचा अपमान असा आरोप चुकीचा. कविकट्ट्याला नाव दिलं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच काही लोकांना द्राक्ष आंबट, पण नाशिकची द्राक्ष आंबट नाहीत, असं म्हणत भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. तसेच पाकिस्तानातही साहित्य संमेलन लोकांनी पाहिलं. आता समारोप होतोय, माझा जीव भांड्यात पडला असं देखील भुजबळ यांनी म्हटलं आहे.

मराठीला अभिजात दर्जा द्या

अ. भा. साहित्य महामंडळाच्या वतीने विविध ठराव मांडण्यात आले. प्रथम दिवंगत साहित्यिक व विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने देण्यात यावा, मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू नयेत म्हणून राज्य शासनाने प्रयत्न करावे असे ठराव मंजूर करण्यात आले. कर्नाटकातील मराठी भाषेची गळचेपी होत असल्याबद्दल कर्नाटक सरकारचा सरकारचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राचे पुनरुज्जीवन करावे व तेथे मराठी माणसांची नेमणूक करावी, भारत सरकारच्या खात्यात ळ वर्ण वापरण्यात यावा, ग्रंथालय कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन देण्यात यावे, न्या रानडे यांचे निफाड येथे स्मारक तसेच नाशिक येथे वामनदादा कर्डक व बाबुराव बागुल यांच्या स्मारकाच्या कामास गती द्यावी हेही ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले.

साहित्य संमेलनात झालेले ठराव

– साहित्य, कला, संस्कृती, समाजकारण, कोरोना बळींना श्रद्धांजली.
– मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा, राज्य सरकारच्या प्रस्तावावर केंद्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा.
– नैसर्गिक आपत्तीमुळे गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी. साहित्यिकही सर्वतोपरी मदत करणार.
– मराठी भाषिक शाळा बंद पडताय, राज्य सरकारनं उदासीनता झटकून सकारात्मक प्रतिसाद करून शाळा सुरू व्हाव्या.
– प्रकाश निर्मळ यांचं अभिनंदन ठराव.
– भाषाविषयक प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र मराठी विभाग स्थापन करावा ही मागणी
– कर्नाटक सरकार मराठीची गळचेपी करतंय, त्यांच्या धोरणाचा हे सम्मेलन निषेध करीत आहे
– राज्यात ६० बोली भाषा,या भाषांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकारने कृती कार्यक्रम आखावा
– राज्यात सरकारने स्थापन केलेली परिचय केंद्र नामशेष झाली आहे,गोवा आणी राज्यात मराठी मानसंवही नेमणूक करावी
– ळ या वर्णाला न्याय द्यावा
– ग्रंथालय कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला मिळावा. सर्वच वाचनालयानी दर्जा राखावा.
– बागुल, वामनदादा कर्डक यांचं उचित स्मारक व्हावे.
– महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या साहित्याला प्रकाशित आणणाऱ्या औरंगाबादच्या साहित्यिकांचं अभिनंदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button