पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा
मुंबई: कोविड लसीकरणाच्या नोंदणीसाठी वापरण्यात येत असलेल्या CoWIN अॅपमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लसीकरणासाठी स्वत:चं अॅप्लिकेशन वापरु द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. हे पत्र पाठवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनही केला होता. यावेळी स्वतंत्र अॅपच्या वापराविषयी चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करतांना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले.
मोदी-ठाकरे यांच्यातील फोनवरील चर्चेमुळे राज्यातील १८ वर्षांवरील व्यक्तिंच्या लसीकरणाला गती येणार असल्याचं सांगितलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुमारे १५ ते २० मिनिटे चर्चा झाल्याचं कळतं. यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. रेमडेसिवीर इंजेक्शन्स, ऑक्सिजन, लॉकडाऊन, 18 वर्षांवरील व्यक्तिंचं लसीकरण आणि राज्यातील वाढत्या मृत्यूंवर पंतप्रधानांनी माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थिती पंतप्रधानांना अवगत करतानाच राज्यांच्या गरजाही पंतप्रधानांसमोर मांडल्याचं कळतं.
पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले
पुढील तीन दिवसांत राज्यांना ५३ लाख लसींचा पुरवठा
आगामी तीन दिवसांत देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकूण ५३ लाख लसींचा साठा मिळणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. याशिवाय, गेल्या ७ दिवसांत देशातील १८० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. तर १८ जिल्हे असे आहेत की, जिथे गेल्या १४ दिवसांमध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही. तर ५४ जिल्ह्यांमध्ये गेल्या २१ दिवसांत कोणताही नवा रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.
‘मुंबई मॉडेल’ची सुप्रीम कोर्टाकडून स्तुती
मुंबईत आतापर्यंत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबईतील उपलब्ध ऑक्सिजनचा जास्तीत जास्त उपयोग, चांगल्याप्रकारे वितरण आणि बफर स्टॉक तयार करणे यासह बीएमसीची विद्यमान संसाधने एकत्रित करण्याच्या क्षमतेमुळेच मुंबईची ऑक्सिजन समस्या आता इतिहास झाला आहे.
१६ आणि १७ एप्रिलच्या मध्यरात्री ६ शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा खूप कमी झाला होता. तेव्हा १६८ रुग्णांना तातडीने जम्बो कोविड सेंटरच्या कार्डिएक रुग्णवाहिकेत शिफ्ट करण्यात आले. त्यामुळे सगळ्यांचे जीव वाचविण्यात यश आलं. या घटनेनंतर १७ एप्रिलला बीएमसीने राज्य टास्क फोर्सकडे ऑक्सिजन वापरासाठी प्रोटोकॉल बनविण्याची मागणी केली.
ऑक्सिजनचे कोणतेही प्रश्न उद्भवू नयेत, यासाठी केंद्रात पोस्टिंग दरम्यान काम केलेल्या अधिकाऱ्यांशी दिल्लीत संपर्क साधला. यावेळी कॅबिनेट सचिव राजीव गौबा, गृहसचिव, आरोग्य सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील आठ शीर्ष राजकारण्यांना ही याबाबत संदेश दिला. ऑक्सिजन आयात करण्यासाठी केंद्राला सूचनाही दिली.