मराठा विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गाऐवजी ईडब्लूएस किंवा खुला प्रवर्ग निवडावा लागणार
एमपीएससीचे परिपत्रक
पुणे: मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (एमपीएससी) एसईबीसी आरक्षण कोट्यातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना निवडावा लागणार ईडब्लूएस पर्याय निवडण्या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गाऐवजी आता ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. उमेदवारांकडे खुल्या प्रवर्गाची निवड करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं प्रवर्ग निवडीबाबतचं परिपत्रक काढलं असून २३ जूनपर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत डिसेंबर, २०१८ नंतर प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरुन सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षित पदांच्या आधारे भरतीप्रक्रिया राबवली होती. त्या भरतीप्रक्रियेच्या विविध टप्प्यावर प्रलंबित असलेल्या व शिफारशी करण्यात न आलेल्या केवळ एकूण १२ संवर्ग/परीक्षांच्या बाबतीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून अर्ज केलेल्यासंबंधित उमेदवारांना अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यापैकी कोणता लाभ घ्यावयाचा आहे याची निवड करायची आहे.
प्रवर्ग न निवडल्यास त्यांना खुला प्रवर्गात ग्राह्य धरणार
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांनी आयोगाच्या दिनांक ४ जानेवारी, २०२१ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकास अनुसरुन कोणत्याही पदभरती/परीक्षांकरीता यापूर्वी प्रवर्ग निवडला असला तरी मराठा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना पुन्हा नव्याने प्रवर्ग निवडावा लागेल.
ईडब्लूएस प्रमाणपत्र सादर कागदपत्र पडताळणीवेळी सादर करावे लागणार
खुला तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या लाभाकरीता विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटीची पुर्तता करणे अनिवार्य आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ३१ मे २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार सक्षम प्राधिका-याकडून प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे व प्रमाणपत्र पडताळणीच्यावेळी सादर करणे आवश्यक राहील.
एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षा/संवर्गाकरीता खुला किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्ग निवडावा लागेल.
प्रवर्ग कसा निवडावा?
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गातील उमेदवारांनी pd/e परीक्षांकरीता अर्ज केला आहे. त्या प्रत्येक पदभरती/परीक्षांकरीता अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांपैकी प्रवर्ग निवडावयाचा आहे. त्यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘Online Facilities’ या सदराखालील SEBC Option Change लिंक वर क्लिक करावं.