मुंबई : अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर अॅड.जयश्री पाटील चांगल्याच चर्चेत आल्या. मात्र, सध्या त्यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विरेंद्र पवार यांनी ही तक्रार दाखली केली असून त्यांनी जयश्री पाटील यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. अनिल देशमुख 100 कोटी रुपये वसुली प्रकरणात जयश्री पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी बोलत असताना जयश्री पाटील या नेहमीच मराठा समाजाचा उल्लेख करतात. तसेच मुद्दामहून मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप तक्रारदार विरेंद्र पवार यांनी केला आहे. तसेच सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल तसेच अटक करण्याची मागणीसुद्धा पवार यांनी केली आहे.
अॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील या सध्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाचे नेते विरेंद्र पवार (Virendra Pawar) यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीच्या टार्गेटचे आरोप झाल्यानंतर जयश्री पाटील (Jayashree Patil) यांनी याचिका दाखल करत या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता.
विरेंद्र पवार यांनी ही तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी जयश्री पाटील यांच्यावर अनेक आरोप केले. त्यांनी जयश्री पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच पाटील यांनी माफी माफी मागितली नाही, तर आगामी काळात मराठा समाज आणखी आक्रमक होईल, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.