मुंबई : गेल्या वर्षी बनावटरित्या वाहिन्यांचा टीआरपी वाढवून त्याच्याआधारे जाहिराती मिळवण्याचा घोटाळा मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणाचा तपास ईडी देखील करत आहे. ईडीने कारवाईअंतर्गत ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ व ‘महा मुव्ही’ या वाहिन्यांच्या मुंबई, इंदूर, दिल्ली व गुरुग्राम येथील मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
टीआरपी घोटाळ्यामध्ये नाव आलेल्या टीव्ही चॅनेल्सला ईडीने पुन्हा एकदा दणका दिला आहे. फक्त मराठी, बॉक्स सिनेमा, महा मूव्ही चॅनेल्सची ३२ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यामध्ये मुंबई, इंदूर, दिल्ली आणि देशातील इतर शहरातील स्थावर मालमत्ता आणि बँक खात्यातील रकमेचा समावेश आहे. या घोटाळ्याची व्याप्ती ४६ कोटींपर्यंत असल्याचं समोर आलं आहे.
‘ईडी’ने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये जमिनी, व्यावसायिक जागा तसेच निवासी संकुलांचा समावेश आहे. यापैकी व्यावसायिक जागा मुंबई आणि दिल्लीतील आहेत. तर जमिनी या गुरुग्राम आणि इंदूर येथील आहेत. मुंबईतील निवासी संकुलांचाही समावेश आहे. मुख्य म्हणजे, याच घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक टीव्हीविरुद्धदेखील तपास सुरू आहे. पण ‘ईडी’ने केलेल्या कारवाईत रिपब्लिक टीव्हीचा उल्लेख नाही.