
पणजी – गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पणजीत अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. भाजप सोडण्याचा निर्णय सर्वात कठीण होता. जर पणजीतून चांगल्या उमेदवाराला पक्षाने तिकीट दिली असती तर मी निवडणूक लढवली नसती असा दावा उत्पल पर्रिकर यांनी केला आहे. दरम्यान, जेव्हा माझे वडील मनोहर पर्रिकर यांना पक्षातून बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. त्यावेळी मनोहर पर्रिकर यांना लोकांचे मोठं समर्थन होते त्यामुळे त्यांना बाहेर करता आलं नाही. आता ते विरोधक पक्षात मोठ्या पदावर आहेत. तर मी जनतेच्या सोबत आहे असंही उत्पल पर्रिकर यांनी म्हटले आहे.
भाजपने पणजीतून उत्पल पर्रिकर यांना तिकीट न देता विद्यमान आमदार मॉन्सरेट यांना मैदानात उतरवलं आहे. मागील अनेक वर्षापासून पणजीतून मनोहर पर्रिकर यांनी नेतृत्व केले होते. मात्र त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत मॉन्सरेट यांनी काँग्रेसच्या तिकीटावर बाजी मारली. कालातरांने मॉन्सरेट यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपनं पणजीतून त्यांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या या निर्णयामुळे उत्पल पर्रिकर दुखावले गेले. भाजप नेहमीच मनात राहील अशी खंत त्यांनी बोलून दाखवत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
उत्पल पर्रिकर म्हणाले की, पक्ष सोडणं सर्वात कठीण निर्णय होता. हा निर्णय मला घ्यावा लागणार नाही अशी अपेक्षा होती परंतु मला हा निर्णय करणं भाग पडलं. परंतु कधी कधी कठीण निर्णय घ्यावे लागतात. जर पणजीतून पक्ष कुठल्या चांगल्या उमेदवाराला उतरवण्याचा निर्णय घेत असेल तर मी माझा निर्णय मागे घेण्यासही तयार आहे, असं त्यांनी स्पष्ट केले.
त्याचसोबत मला पक्षाने तिकीट दिली नाही ते १९९४ च्या स्थितीसारखं आहे. मनोहर पर्रिकर यांना पक्षातून बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. त्यावेळी मनोहर पर्रिकर यांना लोकांचे मोठं समर्थन होते त्यामुळे त्यांना बाहेर करता आलं नाही. आता ते विरोधक पक्षात मोठ्या पदावर आहेत. तर मी जनतेच्या सोबत आहे असंही उत्पल पर्रिकर यांनी खुलासा केला.
उत्पल पर्रिकर यांनी २०१९ च्या पणजी पोटनिवडणुकीचाही उल्लेख केला. मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर पणजीत पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी लोकांचं समर्थन असतानाही मला तिकीट देण्यात आली नाही. जेव्हा जे.पी. नड्डा गोव्यात आले होते तेव्हा ५ दाम्पत्यांनी होणाऱ्या निवडणुकीत तिकीट मागितलं होतं. जर मनोहर पर्रिकर जिवंत असते तर एकाही पुरुष नेत्याने स्वत:च्या पत्नीला तिकीट मागण्याची हिंमत केली नसती असंही त्यांनी सांगितले.
गोव्यामध्ये पाच वर्षांत तब्बल ६० टक्के आमदारांचे पक्षांतर
गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपच्या कारभाराबाबत असलेली नाराजी, त्यात पारंपरिक काँग्रेस, भाजप, मगोप यांच्यासोबत तृणमूल काँग्रेस, आप, शिवसेना-राष्ट्रवादी हे मैदानात उतरलेले पक्ष आणि उत्पल पर्रिकर यांनी केलेलं बंड यामुळे गोवा विधानसभेची निवडणूक रंगतदार झाली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांमध्ये गोव्यामध्ये आमदारांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर केलं आहे. याबाबतची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे.
गोव्यामध्ये गेल्या ५ वर्षांमध्ये सुमारे २४ आमदारांनी एक पार्टी सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. एकूण ४० आमदार अलेल्या गोव्यामध्ये याची टक्केवारी ही ६० टक्क्यांपर्यंत जाते. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, या प्रकरणात गोव्याने एक विचित्र रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. ज्याचे भारतीय लोकशाहीमध्ये दुसरे उदाहरण मिळत नाही.
या अहवालात सांगण्यात आले की, पक्ष सोडणाऱ्या २४ आमदारांच्या यादीमध्ये विश्वजित राणे, सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांच्या नावाचा समावेश नाही आहे. त्यांनी २०१७ मध्ये काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. ते भाजपमध्ये दाखल झाले होते. तसेच त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली. २०१९ मध्ये काँग्रेसच्या तब्बल १० आमदारांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामध्ये काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांचाही समावेश होता. भाजपामध्ये गेलेल्या काँग्रेस आमदारांमध्ये जेनिफर मोन्सेरेट, फ्रान्सिस सिल्वारिया, फिलिप नेरी रॉड्रिग्स, विल्फ्रेड नाजरेथ मेनिनो डीसा, क्लेफसियो डायस, अँटोनियो, कारानो फर्नांडेस, निळकंठ हळर्नकर, इसिडोर फर्नांडिस, बाबुश मोन्सेरात यांचा समावेश होता.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार दीपक पावस्कर आणि मनोहर आजगावकर हेही याच काळात भाजपमध्ये दाखल झाले. त्याशिवाय गोवा फॉरवर्ड पक्षामधील आमदार जयेश साळगावकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. तर हल्लीच गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार रवी नाईक यांनी भाजपत प्रवेश केला. तर अजून एक माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुईझिन फालेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर २०१७ मध्ये जिंकलेले चर्चिल आलेमाव यांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.