सांगली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक आणि सुटकेनंतर राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. पोलीस आणि गुंडांच्या जोरावर ठाकरे सरकारचा कारभार चाललंय, असा आरोप पाटील यांनी सांगलीत बोलताना केलाय. तसंच परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु आहे. कायद्याच्या दृष्टीनं केसेस दाखल होत आहे. नाशिक युनिटने चार केसेस दाखल केल्या आहेत. आपल्याला वकिलांची तगडी फौज निर्माण करायची असल्याचंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
महाविकास आघाडीतील तीन पक्ष आता शेवटची तडफड करत आहेत. राणेंच्या विषयात उद्धव ठाकरे यांचं वाक्य वाहून गेलं. आपण उद्धव ठाकरे हे काय बोलले होते हे सांगायला कमी पडलो. आम्ही तुटू फुटू असं त्यांना वाटतंय. पण आम्ही सुद्धा संयमाने एक एक बॉम्ब टाकतो आणि गायब होतो, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिलाय. सत्ता गेल्यानंतर मनस्थिती टिकवणं अवघड आहे. पण इथून कुणीही जाणार नाही, असा विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केलाय.
ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय भाजप एकही निवडणूक होऊ देणार नाही. नेहमी एकमेकांविरोधात भांडायचं आणि फुटायची वेळ आली की एकमेकांना घट्ट पकडून ठेवायचं. लोकांना उल्लू बनवण्याचं काम सुरु आहे. लोक निवडणुकीची वाट पाहत आहे. पंढरपूरप्रमाणे देगलुरची पोटनिवडणूकही भाजप जिंकणार असा विश्वासही पाटील यावेळी व्यक्त केला.