राजकारण

२०२४ लोकसभा निवडणुकीसाठी एकजूट होण्याचे ममतांचे विरोधी नेत्यांना आवाहन

कोलकाता : कोरोनाचा प्रादुर्भाव शमल्यानंतर आपण सर्व भाजप विरोधक एकत्र मिळून काम करू. मी स्वतः राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि लोकांच्या मुद्यांवर मिळून काम करू इच्छित आहोत. पण, एका हाताने टाळी कधी वाजत नाही. सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायला हवे, असे सांगत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकले आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. विशेष म्हणजे सरकार सत्तेत येत असताना त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आताच सर्व विरोधकांनी एकजूट करायला हवी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी नवनियुक्त आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीत सर्वांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर कोरोना नियमाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि स्थानिकांची मदत करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

निवडणूक निकालानंतर विविध भागांत हिंसाचाराच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. अशावेळी बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी शांततेचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर कोरोनाशी लढाई ही आपली प्राथमिकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विजयानंतर उद्धव ठाकरे, नवीन पटनायक, रजनीकांत, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अभिनंदनासाठी फोन केले. मात्र, पंतप्रधान मोदींनी अद्याप फोन केला नसल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी ममतांना पोटनिवडणुकीचा आधार

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांच्या नजरा खिळलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असला तरी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममधून पराभूत झाल्या. यामुळे एक नवीन पेच निर्माण झाला आहे. ममता मुख्यमंत्रीपदी राहू शकतील का, असा प्रश्न निर्माण झाला असताना मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी ममतांना पोटनिवडणुकीचा आधार घ्यावा लागणार आहे. कलम १६४ नुसार, जो मंत्री सलग सहा महिने एखाद्या राज्याच्या विधानसभेचा भाग नसतो तो या कालावधीची मुदत संपल्यानंतर मंत्री होऊ शकत नाही. याचा अर्थ ममता यांना आमदार होण्यासाठी ६ महिन्यांचा अवधी आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये विधान परिषद नसल्यामुळे ममता यांना ६ महिन्यात एखाद्या रिकाम्या जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल करावा लागेल आणि पोटनिवडणूक जिंकून आमदार व्हावे लागेल. ममता बॅनर्जी नंदीग्राममधून पराभूत झाल्या असून एकेकाळी त्यांचे निकटचे सहकारी असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा निसटता पराभव केला.

निवडणूक विश्लेषकांच्या मतानुसार ममता पराभूत झाल्या असल्या तरी त्या निश्चितपणे पुन्हा एकदा बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. तसे बघायला गेल्यास भारतातील तीन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री नितीशकुमार, योगी आदित्यनाथ आणि उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. मात्र, विधानसभेचा भाग नाहीत. सरळ शब्दात सांगायचे झाल्यास मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुका जिंकल्या नाहीत. मात्र, विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्रीपद टिकवून ठेवले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर कधीही सार्वत्रिक निवडणूक लढविली नाही.

पश्चिम बंगालमध्ये विधान परिषद नसल्यामुळे ममता बॅनर्जी यांना या मागच्या दाराचा आधार नाही. मात्र, तृणमूल काँग्रेस ममता यांचे मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी आतापासून तयारीला लागले आहे. विधानसभेची एखादी रिकामी जागा करण्यासाठी प्रसंगी तृणमूल काँग्रेसच्या एखद्या आमदाराला राजीनामा देण्यास सांगण्यात येईल.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने२१३ जागा पटकावतदणदणीत विजय मिळवला असून दोनशे जागा जिंकण्याचा दावा करणार्‍या भाजपाला केवळ ७७ जागांवरच समाधान लागले.मात्र, तृणमूल आणि भाजपच्या घमासानात काँग्रेस आणि डावे कम्युनिस्ट पक्षांचे आव्हान संपुष्टात आले.काँग्रेसआणि डाव्यांना एकही जागा मिळाली नाही.काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या तब्बल ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या दोन ठिकाणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या तिथेही काँग्रेसच्या उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की आली.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, डावे पक्ष आणि आयएसएफ आघाडीने २९२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ ४२ जागांवर अनामत रक्कम वाचवता आली. या आघाडीतील आयएसएफ या घटक पक्षाला एक जागा मिळाली.तर काँग्रेस आणि डाव्या आघाडीला एकही जागा मिळाली नाही.त्यामुळे बंगालच्या विधानसभेत पहिल्यांदाच काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे सदस्य दिसणार नाही.राहुल गांधी यांनी माटीगारा-नक्षलवाडी आणि गोलपोखर येथे १४ एप्रिल रोजी प्रचारसभा घेतल्या होत्या.मात्र येथील काँग्रेसचे उमेदवार आपले डिपॉझिट वाचवू शकले नाहीत.माटीगारा-नक्षलवाडी मतदारसंघावर काँग्रेसचा दशकभरापासून कब्जा होता.मात्र येथील आमदार शंकर मालाकार यांना यावेळी केवळ ९ टक्के मते मिळाली. गोलपोखर येथेही काँग्रेसला केवळ १२ टक्के मते मिळाली

काँग्रेस, डावे पक्ष आणि आयएसएफ आघाडीमध्ये डाव्या पक्षांनी १७० जागा लढवल्या होत्या. त्यापैकी डाव्यांना २१ जागांवर त्यांना डिपॉझिट वाचवता आले. तर काँग्रेसला ९० जागांपैकी ११ जागांवर डिपॉझिट वाचवण्यात यश मिळाले. तर आयएसएफला ३० जागांपैकी १० जागांवर डिपॉझिट वाचवता आले. तसेच एका जागेवर विजयही मिळवला. डाव्या पक्षांना केवळ चार जागांवर. तर काँग्रेसला केवळ २ जागांवर दुसर्‍या क्रमांकावर राहता आले. दरम्यान, या पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत झालेल्या मोठ्या प्रमाणावर घेत झाल्यामुळे त्याचा थेट फायदा तृणमूल काँग्रेसला झाला. बंगालमध्ये काँग्रेसला केवळ २.९४ तर डाव्या पक्षांना केवळ ५ टक्के मते मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button