कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का दिला आहे. देशातील प्रादेशिक पक्षांचे प्रमुख एम.के. स्टॅलिन आणि के. चंद्रशेखर राव यांच्याशी त्यांनी संपर्क साधत देशभरातील गैर भाजप आणि गैर काँग्रेसी मुख्यमंत्र्यांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.
कोणताही प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी चांगल्या अटींवर सोबत नाहीत, यामुळे हे पक्ष त्यांच्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. यापक्षांचे काँग्रेसशी आता चांगले संबंध राहिलेले नाहीत. यामुळे काँग्रेस आपल्या रस्त्याने आणि आम्ही आमच्या रस्त्याने जाणार आहोत, असे ममता यांनी सांगितले. रविवारी ममता यांनी तामिळनाडू आणि तेलंगानाच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. तसेच देशाच्या संघीय रचनेचे संरक्षण करण्यावर त्यांनी चर्चा केली. यामध्ये त्यांनी काँग्रेसला या बैठकीचे निमंत्रण दिले नसल्याचे स्पष्ट केले.
काँग्रेस आणि डाव्यांना भाजपच्या विरोधात इतर विरोधी पक्षांसह एकत्र येण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी ऐकले नाही. बंगालमध्ये काँग्रेस आणि डावे हे तृणमूलचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावर सहकार्य करण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला आहे, असा आरोपही ममता यांनी केला. देशाचे संविधान नष्ट केले जात आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे., असेही ममता म्हणाल्या.