कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामापासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यातील वाद अद्यापही शमलेला पाहायला मिळत नाही. याउलट ममता बॅनर्जी आणि राज्यपालांमधील संघर्ष आणखी शिगेला जाण्याची चिन्हे आहेत. याचे कारण ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांवर मोठा आरोप करत, ते भ्रष्टाचारी असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यपाल जगदीप धनखर यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडे जगदीप धनखर यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. असे राज्यपाल यापूर्वी कधी पाहिले नव्हते, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
राज्यपाल जगदीप धनखर भ्रष्ट आहेत. सन १९९६ च्या हवाला जैन प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते. एवढेच नव्हे तर, त्याच्यांविरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले होते. जीटीएच्या तपासणीपूर्वी राज्यपालांच्या भेटीची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी कोणत्या लोकांना आपल्याबरोबर घेतले? याची चौकशी झाली पाहिजे. ते उत्तर बंगालमध्ये का गेले? आपण कोणाला भेटलात? भाजपचे आमदार, खासदार अचानक उत्तर बंगालमध्ये का गेले, अशी विचारणाही ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
राज्यपाल दार्जिलिंगला जाऊन भाजपच्या आमदार, खासदार यांना भेटले. ही मंडळी बंगालचे तुकडे करू पाहतायत. राज्यपालही त्यांच्यात सामील असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच राज्यपाल मुद्दाम उत्तर बंगालला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यपाल लोकांना आंदोलन करायला लावतात, हे राज्यपालांचे काम आहे का, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.