नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी भाजपचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम करण्याची तयारी दाखवली आहे. याबाबत चौधरी यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससोबत काँग्रेसने काम करायला मला कोणताही आक्षेप नाही. चौधरी हे पक्षाचे लोकसभेतील नेते आणि काँग्रेस कार्यकारिणी समितीचे सदस्यही आहेत. ममता बॅनर्जी यांचे टीकाकार अशीही त्यांची प्रतिमा आहे.
ते म्हणाले, गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी बॅनर्जी यांचा पक्ष आणि प्रदेश काँग्रेस एकत्र येत असतील तर माझा त्यालाही विरोध नाही. गुजरातमध्ये दोन दशके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्ताधारी भाजपचे नेते राहिले आहेत. गुजरात काँग्रेसमध्ये एक गट तृणमूल काँग्रेसशी युती करण्याचा आग्रह धरत आहे. भाजपला जे पक्ष वैचारिक पातळीवर विरोध करतात ते काँग्रेसचे मित्र होऊ शकतात. सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ममता बॅनर्जी, एम. के. स्टालिन, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन, फारूक अब्दुल्ला, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, हे नेते केंद्र सरकारच्या काही विशिष्ट धोरणांच्या विरोधात एकत्र आले आहेत.