
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली. या यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी रत्नागिरी, लांजा, राजापुरात झालेल्या कार्यक्रमांद्वारे राणे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला इशाऱ्यांवर इशारे दिले. आता राणे अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. त्यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निशाण्यावर घेत टोलेबाजी केली.
महाविकास आघाडीचं सरकार येऊन जवळपास २ वर्षे झाली आहेत. या २ वर्षांत कोकणाला काय दिलं, असा सवाल राणेंनी उपस्थित केला. दादागिरी करू नका, माझ्या वाट्याला जाऊ नका, असा गर्भित इशारा त्यांनी दिला. मी यांचे सर्व पराक्रम जनतेसमोर आणणार, असा इशारा देखील राणेंनी दिली. कोकणात यापुढे आमदार आणि खासदार भाजपाचे असणार असं सांगत महाराष्ट्रात भविष्यात आमचं सरकार येणार, असा दावा देखील राणे यांनी केला. घरात, पिंजऱ्यात राहून कुणी बोलतं का?, असा सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला देखील लगावला. त्याचप्रमाणे माझ्या घराबाहेर आलेल्या ‘चिव’सैनिकांचा सत्कार झाला; मात्र पोलिसांनी त्यांना चोप-चोप चोपला, असा टोला देखील राणे यांनी लगावला.
काही जणांना सत्तेची मस्ती आलीय. ती मस्ती दाखवण्याचा प्रयत्न होतोय. भविष्यात राज्यात आमची सत्ता येईल. पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी. अन्यथा पुढे कारवाईचा सामना करावा लागेल, असा इशारा राणे यांनी दिला.
आज शिवसेनेचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कोकणानं शिवसेनेला भरभरून दिलं. पण शिवसेनेनं कोकणाला काय दिलं, असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला. शिवसेनेचे आमदार विधानसभेत तोंड उघडत नाहीत, अशा शब्दांत राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं.
युतीचा निर्णय झालाच तर पक्ष सांगेल तो निर्णय मान्य
भविष्यात भाजप-शिवसेनेची युती झाली तर काय करणार, असा सवाल राणेंना विचारण्यात आला. त्यावर मी जर-तरच्या प्रश्नांना उत्तर देत नाही. पण युतीचा निर्णय झालाच तर पक्ष सांगेल ते मला मान्य असेल, असं राणेंनी स्पष्ट केलं. शिवसेनेची जुनी प्रकरणं बाहेर काढणार असल्याचा इशारा देणाऱ्या राणेंनी थोडा सावध पवित्रा घेतला. वहिनीवर अॅसिड हल्ला करण्याचा आदेश कोणी व कधी दिला, असा खळबळजनक आरोप करणाऱ्या राणेंनी याबद्दलचे प्रश्न टाळले. मी काही गोष्टी कंसात बोलतो. त्याबाहेर बोलत नाही, असं म्हणत राणेंनी जास्त बोलण्यास नकार दिला.
राणे यांनी काही जुन्या प्रकरणांनाही हात घातला. सुशांतसिंह राजपूत हत्या आणि दिशा सालियान प्रकरण अद्याप संपलेले नाही. नारायण राणेच्या पाठी लागू नका, नाही तर मी आता थोडंच बोलतोय, मग सर्वच बोलाव लागेल. ते परवडणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला आहे.
राणे म्हणाले, जगाच्या पाठीवर, घरात राहून, पिंजऱ्यात राहून कुणी सत्ता चालवली, असे एकही उदाहरण नाही. मंत्रालयात जायचे नाही, कॅबिनेटला हजर राहायचे नाही. फक्त वर्षावर गप्पा मारायला जायचे, असे म्हणत, केस केल्यामुळे राणे घाबरून जाईल असे यांना वाटत असेल, मात्र, मी घाबरणारा नाही. ते रक्तातच नाही, असेही राणे म्हणाले.
क्रिमिनल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं?
जर मी क्रिमिनल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? इतके दिवस मंत्री कसा राहिलो? असा सवालही राणेंनी विरोधकांना केलाय. आता मोदींच्या काळात केंद्रीय मंत्री झालो. पण पहिली पदं यांनीच दिली ना. तेव्हा नव्हतं का कुणी विरोध करायला? असंही राणे म्हणालेत. साहेबांना जेव्हा दहशतवाद्यांकडून धोका होता, तेव्हा त्यांना मातोश्री सोडायला सांगितलं तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असा टोला राणेंनी लगावलाय.




