महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्रातील नवे तालिबानी : आशिष शेलार
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. यातच विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या धक्काबुक्की प्रकारावरून भाजपाच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
निलंबन झालेल्या आमदारांमध्ये आशिष शेलार यांचाही समावेश आहे. याबाबत शेलार म्हणाले की, तालिबानी संस्कृतीला लाजवेल असं ठाकरे सरकार वागत आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रुपाने नवे तालिबानी महाराष्ट्रावर राज्य करू पाहत आहे. भाजपाच्या कोणत्याही आमदाराने भास्कर जाधवांना शिवीगाळ केली नाही. तालिका अध्यक्षांना कुठेही धक्काबुक्की झाली नाही. ओबीसी आरक्षणात बोलू न दिल्याने घटनात्मक त्रागा करणाऱ्या सदस्यांना जागेवर बसवण्याचं काम मी केलं. उपाध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ करणारे सदस्य भाजपाचे नव्हते. तरी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना असं वाटत असेल तर पक्षाच्या वतीने क्षमा मागतो असं आम्ही सांगितले. परंतु तालिबानी सरकारने आमच्या आमदारांवर कारवाई केली. माझा सामना करण्याची ताकद शिवसेनेत नाही. नो बॉलमध्ये विकेट काढण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. परंतु मी क्रिकेटमधला खेळाडू आहे. दोन्ही हातांनी बॉलिंग करून सभागृहाबाहेर तुमची पळता भुई करून टाकेन, असा इशारा आशिष शेलारांनी दिला आहे.
ही तर ठाकरे सरकारची हिटलरशाही; भाजपाचा घणाघात
आमदारकी गेली तर चालेल; रस्त्यावर संघर्ष सुरूच राहील, असं म्हणत भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी निशाणा साधला आहे. सातपुते म्हणाले की, “आम्ही शिवीगाळ केलेली नाही. एक कथा रचून आमचं निलंबन करण्यात आलं. पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. आमदारकी गेली तरी चालेल. पण जनतेच्या प्रश्नांसाठी लढतच राहणार. बारा आमदारांचं निलंबन म्हणजे ठाकरे सरकारची हिटलरशाही” असं म्हटलं आहे. तसेच सातपुते यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही याबाबत ट्विट केलं आहे. “ओबीसी आरक्षणासाठी लढताना आमचे एक वर्षांसाठी निलंबन झाले… आम्ही सरकारच्या हिटलर प्रवृत्तीचा निषेध करतो” असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.