मा. पक्षप्रमुख, जाहीर करण्यास अत्यंत आनंद होत आहे की, लवकरच आम्ही ‘ महाराष्ट्र शुद्धीकरण व इतर सेवा केंद्र’ च्या माध्यमातून आपल्या सेवेत रुजू होत आहोत. आम्ही जरी मराठी असलो तरी आमची कुशाग्र बुद्धी वडापाव, भोजन थाळी असल्या उद्योगांपलिकडे जाऊन काहीतरी वेगळाच उद्योग शोधत होती.आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घडामोडींचा बारकाईने अभ्यास करतांना आम्हाला या उद्योगाची कल्पना सुचली आणि आम्ही ती लगोलग अमलात आणीत आहोत. आमच्या या नाविन्यपूर्ण उद्योगातून आम्ही विविध राजकीय पक्षांना विविध सेवा पुरविणार आहोत. प्रत्येक सेवेचे शुल्क त्या-त्यावेळी सांगण्यात येईल. ( लग्नाच्या रिसेप्शनला ज्याप्रमाणे किती माणसं, कोणता मेनू यांचा हिशेब करून शुल्क आकारतात, त्याप्रमाणे.) आमच्या मार्फत देण्यात येणाऱ्या सेवा खालील प्रमाणे असतील –
अ) एखादया शिल्पाचे किंवा वास्तूचे शुद्धीकरण – एखाद्या आगंतुकाने एखाद्या स्मारकाला भेट दिल्यास किंवा एखाद्या माजी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी नवीन मुख्यमंत्र्यांनी राहण्यासाठी जाण्याआधी हा विधी करणे आवश्यक असते. १) या विधीसाठी आम्ही पांढऱ्या गाईचे दूध, पांढऱ्या गाईचे गोमूत्र, पांढऱ्या गाईच्या दुधापासून लोणी काढून बनविलेले गावराणी तूप, मधमाश्यांच्या पोळ्यातून काढलेले शुद्ध मध, गंगाजल, पंचामृत, धूप, लोभान, अगरबत्ती, भिमसेनी कापूर तसेच (कोरोना असेपर्यंत) डिसइंफेक्टंट या सामुग्रीचा वापर करतो. ( आपल्या बजेटनुसार सामुग्रीची संख्या , सामुग्रीचे प्रमाण कमीजास्त करून विधी करून देण्यात येईल.) २) शुद्धीकरण प्रशिक्षित ब्राह्मणांच्या हस्ते, शास्त्रोक्त पध्दतीने मंत्रोपचाराद्वारे करून हवे असल्यास ब्राह्मणांच्या संख्येनुसार शुल्क आकारले जाईल. ( आपल्या विरोधकांकडे जरी भरपूर ब्राम्हण असले तरी ते या विधीसाठी ,अगदी फुकट आले तरी, वापरले जाणार नाहीत.) ३) शिल्प / वास्तू कोणाच्या हस्ते दूषित झालेले /झालेली आहे आणि ते /ती कोणत्या पातळीवर ( स्थानिक, राज्य, देश, जागतिक) प्रसिद्ध आहे ते पाहून त्यानुसार शुद्धीकरण शुल्क आकारले जाईल. ४) शुद्धीकरणासाठी येणाऱ्या आमच्या संपूर्ण टीमच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील. ५) गनिमिकाव्याने शुद्धीकरण ( म्हणजे गुपचूप शुद्धीकरण करून पळून जाणे ) करण्याची सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे, त्यासाठी मात्र डबल शुल्क आकारले जाईल.
ब) दुसऱ्या पक्षातून तुमच्या पक्षात येणाऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधीचे ( ग्रा.पं. सदस्यापासून ते थेट नामदारापर्यंत ) शुद्धीकरण ( शारीरिक व मानसिक) – १) वरीलपैकी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे शुद्धीकरण करतांना तो कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षात चालला आहे , त्यामुळे त्याचा व संबंधित दोन्ही पक्षांचा होणारा लाभ, होणारी हानी लक्षात घेऊनच शुल्क आकारले जाईल. २) एका लोकप्रतिनिधी सोबत काही कार्यकर्त्यांचे शुद्धीकरण ( फक्त शारीरिक . मन मारून जगता जगता कार्यकर्त्यांचे मनच मरून गेलेले असते ! मेलेल्या मनाचे काय शुद्धीकरण करणार (?) मोफत करून मिळेल. यासाठी लोकप्रतिनिधीच्या दर्जानुसार कार्यकर्त्यांची संख्या ठरविण्यात येईल. ३) आम्ही निर्धारित केलेल्या संख्येपेक्षा जास्त कार्यकर्त्यांचे शुद्धीकरण करून हवे असल्यास त्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाईल.
क) आमचे एक प्रचंड मोठे ग्रंथालय असेल. १) त्यात प्रबोधनकारांचे साहित्य, जातिवादाचा आधुनिक (?) इतिहास, जातिवादाचा अर्वाचीन इतिहास, अनेक थोर पुरुषांची आणि काही निवडक राजकारण्यांची ( त्यांचे चारित्र्य संशयास्पद असले तरी !) आत्मचरित्रे, काळा पैसा पांढरा कसा करावा, सेल कंपन्यांमध्ये गुंतवणूक कशी करावी, आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना टार्गेट कसे व किती द्यावे, कार्यकर्त्यांना पटतील अशी पक्षांतर करण्याची १०१ कारणे यासारखी अनेक पुस्तके असतील. ती आपण आमच्याकडून विकत घेतल्यास आपल्या दिवाणखान्यातील सेल्फवर, माध्यमांना मुलाखत देतांना दिसतील आणि त्यातून आपल्या ( नसलेल्या) विद्वत्तेचे (प्र)दर्शन होईल अशा प्रकारे आमच्याकडून मोफत लावून देण्यात येतील. २) अनामत रक्कम ( निवडणुकीत अनेकांची जी जप्त होते आणि त्या भितीपोटी अनेकजण निवडणूक लढवत नाहीत, ती !) भरून आणि अल्प शुल्क भरून जे सभासद ग्रंथ वाचण्यासाठी नेतील, त्यांना तो ग्रंथ वाचल्याबद्दलचे आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येईल. कोणी तुमच्या ज्ञानाबद्दल जाहीरपणे शंका उपस्थित केल्यास त्यास उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन, ‘मी हे वाचलं आहे. मी तेही वाचलं आहे.’ असले पोरकट खुलासे देण्यापेक्षा आम्ही दिलेले प्रमाणपत्र माध्यमांना दाखवून आपण ‘ज्ञानवंत’ असल्याचे सिद्ध करता येईल.
ड ) याशिवाय आपल्या मागे भिंतीवर लावण्यासाठी ‘ इंद्रजाल यंत्र ‘, खिशात ठेवण्यासाठी ‘ वशीकरण यंत्र’, कोणत्याही यंत्रणेच्या चौकशी अधिकाऱ्याला निष्प्रभ करणारे ‘ प्रभानील मणी’ तसेच विरोधी नेत्याचा ( आपल्या पक्षातला असो की विरोधी !) ‘बंदोबस्त’ करण्यासाठी किंवा त्याला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी बंगाली बाबाची ‘होम सर्व्हिस’ अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण सेवा देण्यात येतील.
महत्वाची सूचना – आम्ही सर्व पैसे आगाऊ घेतो. आम्ही कोणालाही कमिशन देत नाही.
संपर्कासाठी – ४२० ४२० ४२०.