मुक्तपीठ

गृहमंत्र्यांभोवतीचा चक्रव्यूह

- भागा वरखडे

गेल्या आठवड्यातच नितेश राणे व केशव उपाध्ये यांनी सचिन वाझे यांच्यावर आयपीएल सट्टयातील दीडशे कोटी रुपये खंडणी उकळून ती वरुण सरदेसाई यांच्याकडे दिल्याचा आरोप केला होता. वरुण सरदेसाई हे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. संजय राठोड प्रकरणापासून गृहमंत्रालय वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. ज्या सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले, शिवाय सचिन वाझे यांना गृहमंत्र्यांनी शंभर कोटी रुपये दरमहा वसुलीचे टार्गेट दिले होते, असा त्यात आरोप केला; शिवाय ही बाब ठाकरे आणि शरद पवार यांनाही माहीत होती, असा दावा केला, त्यावर किती विश्‍वास ठेवायचा हा प्रश्‍न आहे. त्याचे कारण राष्ट्रीय तपास संस्थेच्या तपासात मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या इमारतीसमोर जिलेटीन भरलेली गाडी उभी करणे आणि या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा आरोप ज्यांच्यावर आहे, त्या वाझे यांची वकिली सिंग का करीत आहेत, असा प्रश्‍न उपस्थित होतो. वाझे यांनी यांची चौकशी सुरू आहे, त्यांनी हा आरोप केला असता, तर एकवेळ समजण्यासारखे आहे; परंतु सिंग यानी हा आरोप केला. देशमुख यांनी सिंग यांच्या अक्षम्य चुकामुळे त्यांना पोलिस आयुक्तुपदावरून हलविण्यात आल्याचे सांगितले. राष्ट्रीय तपास संस्थेच्या तपासात अंबानी यांच्या घरासमोर गाडी उभी करण्याचा कट वाझे यांच्या घरी आणि मुंबईच्या पोलिस आयुक्त कार्यालयात शिजल्याचे स्पष्ट झाले आहे. वाझे यांना मुंबई पोलिस आयुक्तांकडे थेट प्रवेश कसा होता, त्यांच्याकडे लाखो रुपयांच्या गाड्या कुठून येतात, तरी त्याचे सिंग यांना काहीच वाटले नाही. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना पोलिस अधिकार्‍यांनी बैठकांना येताना पोलिसांची वाहने वापरण्याचा आणि इतरांनी दिलेली वाहने न वापरण्याचा सल्ला अगदी गेल्याच महिन्यात दिला होता. असे असताना वाझे आणि सिंग यांना तो सल्ला आपल्याला नाही, असे कसे वाटले? शिवाय ज्या संजय पांडे यांची राज्य सरकारवर नाराजी आहे आणि त्यांना महत्त्वाच्या पदापासून सरकारने डावलल्याची खंत आहे, त्यांनीही सिंग यांच्या चुकीच्या कारभाराची तक्रार मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली होती.

सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून शंभर कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला असला आणि या त्याचा काही घटनाक्रम दिला असला, तरी गेल्या महिन्याभरापासून सिंग यांनी मौन का पाळले आणि इतक्या उशिरा का तक्रार केली, असा प्रश्‍न पडतो. दुसरा मुद्दा 17 तारखेला देशमुख यांनी सिंग यांच्या अक्षम्य चुका झाल्याचे सांगेपर्यंत त्यांनी आरोप का केला नाही. वाझे यांना अटक होऊनही किती तरी दिवस झाले. सिंग यांना त्यांची इतकी चिंता होती, तर वाझे यांना अटक झाली, त्याचदिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र का दिले नाही, स्वतःवर आरोप होईपर्यंत त्यांनी मौन का बाळगले, या प्रश्‍नाचे उत्तर मिळत नाही. सिंग यांच्या आरोपानंतर आता देशमुख यांनी सविस्तर पत्रक काढून आपल्यावर झालेले सर्व आरोप खोडून काढले आहेत, तसेच एक महत्त्वपूर्ण निर्णयही घेतला आहे. परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल,’ असे म्हणत देशमुख यांनी सविस्तरपणे आपली भूमिका मांडली आहे. तसेच परमवीर सिंग  यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याचा निर्णय देशमुख यांनी घेतला आहे. देशमुख यांच्या या निर्णयावर सिंग नेमके  काय उत्तर देतात, हे पाहावे लागेल. असे असले, तरी आता खरेतर दोघांनीही न्यायालयात दूध का दूध, पाणी का पाणी होऊ देण्यातच हीत आहे. त्यामुळे कोण खरे, कोण खोटे हे सिद्ध होईल. वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ? आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर सिंग यांनी दिनांक 16 मार्च ला सहायक पोलिस आयुक्त पाटील यांना व्हॉटस्अ‍ॅप लहरींवरून काही प्रश्‍न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या लहरींच्या माध्यमातून सिंग यांना पद्धदतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या लहरींवरून उत्तरे मिळविताना सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या लहरींवरून लक्षात येईल. सिंग हे पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय, असा प्रश्‍न देशमुख यांनी विचारला होता. याच चॅटचा आधार घेऊन देवेंद्र फडणवीस देशमुख यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे देशमुख यांनी 18 तारखेला म्हटल्यानंतर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्स्अ‍ॅप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला. वाझे व सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील हे सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत. त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत, असे आव्हान दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button