मुक्तपीठ

ऑपरेशन फ्लायवे

- मुकुंद परदेशी (संपर्क ७८७५० ७७७२८)

तालिबानी सत्तेत आले. अघटितांची श्रृखंलाच सुरु झाली. जीव मुठीत घेऊन पळणाऱ्यांना पाहून जग हेलावलं. काबूल विमानतळावर सुरु झालेला जीव वाचवण्याचा प्रत्येकाचा संघर्ष हा राक्षसी सत्तेला असलेला विरोध अधोरेखित करुन गेला. या सगळ्या घटना तुमच्या आमच्यासारख्या अनेकांनी ‘याचि डोळा’ पाहिल्या पण ‘अफगाणी नागरिकांवर संकट कोसळलंय आणि तिथल्या माणसांना आपली गरज आहे’, असा विचार किती जणांच्या मनात आला? आला तरी ‘आपण काय करु शकतो?’ असं अवसानघातकी वाक्य पुटपूटून अनेकांनी आपलीच असह्यता मनाशी नक्कीच मान्य केली असेल. पण टॉमी मार्कस उपाख्य क्वेन्टिन क्वारंटिनो या सर्वांपेक्षा वेगळा ठरला.

टॉमी मार्कस उर्फ क्वेन्टिन क्वारंटिनो उमर : २५. काम : सोशल मिडियावर पोस्ट टाकणं. धंदा : सोशल मिडियानं दिलेलं स्टार पद टिकवणं. आजघडीला या उमरीतले अनेक तरुण नेमक्या याच उद्योगात व्यस्त असून त्यातूनच ते बख्खळ म्हणता येईल असा पैसा मिळवत आहेत. टॉमीनेही तो मिळवला असेलच, पण त्याहीपेक्षा मोठी दौलत त्याने कमावली. ती म्हणजे विश्वास. या विश्वासामुळेच समाज त्याच्याभोवती कधी नव्हे तो एकवटला नि ३०० जणांचे जीव वाचले.

अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर अफगाणमध्ये बेदिली माजली. कुणालाच काही उमगेना. अफगाणींनाच नव्हे तर आजवर तळ ठोकून असलेल्या अमेरिकेलाही नाही समजले नक्की करायचे काय? जगण्याच्या धडपडीचं केंद्रस्थान काबूल विमानतळ ठरलं. आपल्याला अफगाणच्या सीमेपलिकडे कुणी नेईल की नाही, त्यासाठीची कागदपत्रं आहेत की नाही…आपल्याला नाही तर तान्ह्या मुलांना तरी राक्षसांच्या तावडीतून वाचवू म्हणत अनेक भांबावलेले अफगाणी विमानतळाभोवती कोंडाळं करत होते. हजारो रुपयांनी महागलेल्या निव्वळ पाण्याच्या बाटल्यांवर रखरखीत उन्हात मनाच्या तळाशी आशा धरून बसले होते. ‘कुणी किती का हटकेना…मारेना अथवा झोडेना पण इथून पळायचंच बस्स’, एवढंच काय ते प्रत्येकाचा चेहरा सांगत होता. जीव वाचवण्यासाठीच्या या धडपडीला पाहून आपण फक्त चुचकलो, पण अमेरिकेच्या ब्रूकलिनमध्ये बसलेला टॉमी मार्कस अस्वथला. ट्विटवर क्वेन्टिन क्वारंटिनो नावानं सोशल मिडियावर वावरणारं टॉमीचं काळीज गलबललं.

त्याने क्षणात ‘गो फंड मी’ नावाची मोहिम सोशल मिडियावर उघडली. जितक्या वेगाने त्याच्या बोटांनी मोहिमेचे नाव नक्की केलं त्यापेक्षा कैकपट वेगाने त्या पुढचा टप्पा अमलात आणायलाही सुरुवात केली. सहज म्हणून हाती घेतलेल्या या मोहिमेला गांभिर्याचं कोंदण होतं. टॉमी करत असलेल्या प्रयत्नाला अफाट म्हणता येईल असा प्रतिसाद मिळाला. काही वेळातच सव्वा लाख नागरिकांनी त्याच्या मोहिमेसाठी ५,१०,९६२,५५० रुपयांचा निधी उभा करुन दिला. एखाद्या सोशल मिडिया स्टारने इतक्या कमी वेळात उभारलेली रक्कम निश्चितच मोठी ठरली.

टॉमीच्या मोहिमेचा खरा प्रवास इथून सुरु झाला. अतिशय गुप्तरितीने सुरु झालेल्या या मोहिमेत असंख्य अनाम हात जोडले गेले. कोण होती ही माणसं…कुणाचं कोण होतं…खरं तर यातल्या बऱ्याचजणांची एकमेकांशी साधी ओळखही नव्हती…ओळख सोडा सोशल मिडियावरही त्यांचा दुरान्वेही संबंध आला नव्हता. पण माणूसकीच्या धाग्याने ही सारी माणसे एकमेकांत ओवली गेली. सराया इंटरनॅशनल, रॉकेफेलर फांऊंडेशन या संस्थांनी टॉमीच्या शब्दाखातर काबूल विमानतळावर खासगी विमान उतरवले. दिवस होता १५ ऑगस्टचा. तालिबान्यांकडून तात्काळ धोका असलेल्या आणि भविष्यात अफगाणिस्तानसाठी महत्त्वाची ठरु शकतील अशाच नागरिकांची प्राधान्य क्रमाने सुटका करायचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे अफगाणमधील सहकाऱ्यांनी चोख कामगिरी बजावली. महत्त्वाच्या तेवढयाच ३०० जणांना विमानतळावर आणण्यात आले. त्यांना घेऊन पहाटेच्या सुमारास विमान युगांडाच्या दिशेने झेपावले. टॉमीची ‘ऑपरेशन फ्लायवे’मोहिम फत्ते झाली. अमेरिकेच्या लष्करासाठी कंत्राटदार म्हणून काम करणाऱ्या रावेन ॲडव्हायजरी या कंपनीने या मोहिमेत विशेष पथकातले पूर्वाश्रमीचे कमांडर, सैनिक, अफगाणिस्तान विषयाचे तज्ज्ञ यांना या मोहिमेत सहभागी करुन घेतले. एका आठवडयात मोहिम सुरुही झाली नि फत्तेही. कमीत कमी खर्चात मोहिम पार पडल्यानंतर उर्वरीत निधी वॉशिंग्टनमधल्या ‘वुमन्स मिडीया फाऊंडेशन’ला दान करण्यात आला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोहिमेची गुप्तता इतकी होती की बायडेन सरकारलाही यासंबंधीची कल्पना नव्हती. त्यामुळेच बायडेन सरकारने या ‘ऑपरेशन फ्लायवे’मोहिमेच्या यशाचे कौतुक करताना काहीसा हात आखडता घेतला. या मोहिमेची सत्यासत्यता पडताळून पाहू एवढेच काय ते उत्तर सरकारने दिलं.

काबूलहून युगांडात विमान पोहोचल्यावर यासंबंधीची माहिती उघड झाली. जगभरात ही मोहिम ‘ऑपरेशन फ्लायवे’ नावाने ओळखली गेली.’सर्वांनीच माझ्यावर विश्वास ठेवला नि मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो. ओळखीच्या ना पाळखीच्या माणसांनी सढळ हाताने त्यांचा घामाचा पैसा मदत म्हणून माझ्या हाती ठेवला. ही भावनाच पुढची मोहिम यशस्वी ठरवण्यासाठी शंभर हत्तींचं बळ देऊन गेली,’ असं सांगणारा टॉमी माणूसकीचा जीवंत झरा म्हणून सोशल मिडियावर खऱ्या अर्थाने नाणावला. सोशल मिडियाचा स्टार ठरला. आपल्याकडे मात्र दुर्देवाने अशा माणूसकीच्या ओलाव्याखाली स्वत:चे हात ओले करुन घेण्याचा लाजीरवाणा प्रकार घडतो. स्टार म्हणून ओळखली जाणारी मंडळी ‘कर’ चूकवून दोन्ही करांनी देतो देतो म्हणत भाव खाऊन जातात. वास्तव उघड होतं तेव्हा मात्र माणूसकीच शरमिंदी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button