राजकारण

प्रतिविधानसभेवर मार्शलची कारवाई; ही तर आणीबाणी : फडणवीस आक्रमक

मुंबई: आघाडी सरकारने १२ आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्याचे विधानसभेतही पडसाद उमटले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी प्रतिविधानसभेला देण्यात आलेला माईक काढून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर मार्शलांनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी पोहोचून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजप आमदारांनी गोंधळ घातल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मार्शलने केलेल्या या कारवाईमुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त करत ही तर आणीबाणी असल्याचा आरोप केला.

भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवली. भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षाचे सर्वच आमदार विधानसभेच्या पायरीवर बसले होते. त्याचवेळी विधानसभेतही या अभिरुप विधानसभेचे पडसाद उमटले. सत्ताधारी आमदारांनी अभिरुप विधानसभा बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच विरोधकांना बाहेर माईक कुणी दिला? माईक देण्याची परवानगी कुणी दिली? असा सवाल करतानाच विरोधकांना देण्यात आलेला माईक काढून घेण्याची मागणी करण्यात आली. आमदार भास्कर जाधव आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा ठासून मांडला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी तत्काळ माईक काढून घेण्याचे आदेश दिले.

अध्यक्षांच्या आदेशानंतर मार्शल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आमदारांना माईक देण्याची विनंती केली. विधानसभा अध्यक्षांचे आदेश आहेत. त्यामुळे आम्ही माईक जप्त करण्यासाठी आलो आहोत, असं मार्शल भाजपच्या आमदारांना सांगत होते. मात्र, भाजपचे आमदार ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती झाली. त्याचवेळी मार्शल माईक काढून घेत असताना मीडियाचे प्रतिनिधी पुढे आले आणि त्यांनाही धक्काबुक्की झाली. मीडियालाही दूर जाण्यास मार्शल सांगत होते. त्यामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला.

फडणवीस संतप्त

या संपूर्ण प्रकारावर देवेंद्र फडणवीस प्रचंड संताप व्यक्त केला. मार्शल पाठवून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला. मार्शलशी आमचं भांडण नाही. ते आमचे शत्रू नाहीत. माईक काढला तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही. सरकारच्या विरोधात आम्ही बोलतच राहणार. माध्यमांवर मार्शलकरवी मुस्काटदाबी करण्यात आली आहे. ही आणीबाणी आहे, असं फडणवीस म्हणाले.

चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई करा : जयंत पाटील

मागच्या काळात आम्हीही विरोधी पक्षात होतो. मात्र आम्ही कधीही विधानभवनाच्या आवारात अशी वागणूक केली नाही. विधान भवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. विरोध करण्यास मनाई नाही, मात्र लाऊडस्पीकर लावले जात आहे हे अयोग्य आहे असेही जयंत पाटील यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button