राज्यात लवकरच मराठी भाषा विद्यापीठ : उदय सामंत
नागपूर : मराठी भाषेचा विकास आणि संशोधनाला चालना मिळावी म्हणून राज्यात मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. ही घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. विद्यापीठासाठी आगामी दहा दिवसांत एक समिती स्थापन केली जाईल. समितीचा अहवाल आल्यानंतर मराठी विद्यापीठासंदर्भात पुढील कारवाई सुरु होणार आहे.
सामंत नागपुरात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मराठी भाषा विद्यापीठाबद्दल सविस्तर भाष्य केलं. मागील अनेक दिवसांपासून राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले जावे अशी मागणी केली जात होती. नागरिकांच्या मागणीवर मागील अनेक दिवसांपासून राज्य सरकार विचार करत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यात लकवरच मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले जाईल. त्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.
उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठी भाषा विद्यापीठासंदर्भात सकारात्मक आहेत. त्यामुळे लवकरच हे विद्यापीठ सत्यात उतरणार आहे. त्यासाठीची पहिली पायरी म्हणून येत्या दहा दिवसांत एक समिती स्थापन केली जाईल. ही समिती विद्यापीठावर अभ्यास करुन आपला अहवाल सरकारकडे सादर करेल. समितीच्या अहवालावर राज्य सरकार अभ्यास करेल. त्यानंतर विद्यापीठ स्थापनेची प्रक्रिया सुरु होणार आहे.
महाराष्ट्र अफगाणी विद्यार्थ्यांच्या पाठीशी
दरम्यान उदय सामंत यांनी पुण्यात असलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. काही दिवसांपूर्वी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अफगाणिस्तानमधील मुलांशी चर्चा केली होती. त्याच्या सांगण्यावरून आपण या विद्यार्थ्यांबाबत काय करू शकतो यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो. महाराष्ट्र राज्याच्या परंपरेनुसार आम्ही या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत, असे यावेळी सामंत म्हणाले.