मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीमुळे महाराष्ट्राचा फायदाच : फडणवीस
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मराठा आरक्षण, मेट्रो कारशेड अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले असतील, तर ते चांगलंच आहे. आम्ही तर हेच नेहमी सांगत असतो. कारण पंतप्रधान महाराष्ट्राबद्दल सकारात्मक असतात. राज्य आणि केंद्र यांनी आपापसांत संबंध चांगले ठेवले, तर राज्याचा फायदा होतो. आपल्याकडे जी प्रथा आहे की उठसूठ केंद्राकडे बोट दाखवायचं, ही प्रथा योग्य नाही. आज मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन मोदींची भेट घेतली हे चांगलं आहे, असं ते म्हणाले.
अशा चर्चांमधून महाराष्ट्राचा फायदाच होईल, असं देखील फडणवीस यांनी नमूद केलं. राजकारण निवडणुकीपुरतं असतं. पण इतर काळ समन्वयाची भूमिका असली, तर राज्याचा फायदा होतो. केंद्र सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र सातत्याने राहिला आहे. त्यासंदर्भात भूमिका योग्य ठेवली, तर महाराष्ट्राचा त्यात फायदाच आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणं हे प्रिमॅच्युअर अर्थात वेळेआधीचं असल्याचं म्हटलंय. मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही भेट प्रिमॅच्युअर आहे. भोसले समितीने मराठा आरक्षण पुन्हा मिळवायचं असेल, तर राज्यानं राज्य मागासवर्ग आयोगाची स्थानपना करून त्यामार्फत पुढील कारवाई करायला हवी असं सांगितलं आहे. पण ती कारवाई करण्यात आलेली नाही. पण तरीदेखील भेटले ते चांगलंच आहे. पुढे त्याचा फायदाच होईल, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.