
मुंबई: अनेक कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतानाही सुप्रर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं आहे. त्या जिल्ह्यांची यादीही जारी केली आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज १८ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. बैठकीनंतर टोपे यांनी मीडियाशी संवाद साधून बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. राज्यात ‘होम आयसोलेशन’ पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोविड सेंटरची संख्या वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. असं केल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेल रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात. त्यालाही आळा बसेल, असं टोपे यांनी सांगितलं.
पुढील जिल्ह्यात ‘होम आयसोलेशन’ बंद : बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद, रायगड, पुणे, नागपूर.
राज्यात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत होतं. मात्र, अनेक रुग्ण हातावर होम आयसोलेशनचा शिक्का असतानाही घराबाहेर पडत असल्याचं दिसून आलं आहे. त्यांच्यामुळे अनेक लोकांना कोरोनाची लागण होत असल्याचंही दिसून आलं आहे. तसेच या सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही धोका निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. शिवाय हजारो लोकांच्या घरात शौचालय नाही, अनेकजण सिंगल रुमच्याच खोलीत राहत आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशनवर बंदी घातली आहे. त्यामुळे रुग्णांना आता कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.