Top Newsस्पोर्ट्स

भारत ४ बाद १२५ धावा, मदार आता लोकेश राहुलवर; पावसाचा वारंवार व्यत्यय

लंडन : कसोटीत प्रथमच सलामीला एकत्र आलेल्या रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीनं इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच रडवले. भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीत आतापर्यंत टीम इंडियाचे वर्चस्व जाणवत आहे. भारतीय गोलंदाजांनी यजमानांचा पहिला डाव १८३ धावांवर गुंडाळल्यानंतर रोहित व लोकेश यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण, जेम्स अँडरसनच्या एका षटकानं टीम इंडियाच्या गोटात भीतीचा गोळा टाकला. उप कर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी ठरला अन् आता टीम इंडियाची भिस्त लोकेश व रिषभ पंत यांच्यावर आहे. दरम्यान, पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. भारताचे ४ फलंदाज १२५ धावांवर माघारी परतले असून संघ अजून ५८ धावांनी पिछाडीवर आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लंडचा निर्णय टीम इंडियाच्या पथ्यावर पडला. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना इंग्लंडला पहिल्या डावात दोनशेपारही जाऊ दिले नाही. कर्णधार जो रूट ( ६४) वगळल्यास इंग्लंडचे अन्य फलंदाज भारतासमोर नांगी टेकून माघारी परतले. जसप्रीत बुमराह ( ४) , शार्दूल ठाकूर ( २ ) , मोहम्मद सिराज ( १ ) व मोहम्मद शमी ( ३ ) यांनी इंग्लंडला धक्के दिले. रुटनं १०८ चेंडूंत ११ चौकारांसह ६४ धावा केल्या. सॅम कुरननं फटकेबाजी करताना नाबाद २७ धावा काढल्या. बुमराहनं इंग्लंडची अखेरची विकेट घेतली. इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर गडगडला.

रोहित व लोकेश यांनी पहिल्या विकेटसाठी ३७.३ षटकं खेळून काढताना ९७ धावांची भागीदारी केली. २००७ नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात भारतीय सलामीवीरांना २५ पेक्षा अधिक षटकं खेळण्यात यश आलं आहे. २००७ मध्ये दिनेश कार्तिक व वासीम जाफर यांनी हा पराक्रम केला होता. ऑली रॉबिन्सननं ही जोडी तोडली. त्यानं रोहित शर्माला (३६ धावा, १०७ चेंडू) माघारी पाठवले. त्यानंतर अँडरसननं ४१ व्या षटकात टीम इंडियाला सलग दोन धक्के दिले. चेतेश्वर पुजारा (४) ला यष्टिरक्षक जोस बटलरकरवी बाद केल्यानंतर कर्णधार विराटलाही त्यानं गोल्डन डकवर माघारी जाण्यास भाग पाडले. दरम्यान लोकेशनं अर्धशतक पूर्ण केले, परंतु अजिंक्य रहाणे (५) एकदा वाचूनही दुसऱ्यांदा धावबाद होऊन माघारी परतला.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ९ वेळा गोल्डन डक (पहिल्याच चेंडूवर) बाद होण्याचा नकोसा विक्रम विराटच्या नावावर नोंदवला गेला आहे. महेंद्रसिंग धोनी ८ आणि मन्सूर अली खान पतौडी ७ यांचा विक्रम मोडला. खराब प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. भारताचे ४ फलंदाज १२५ धावांवर माघारी परतले आहेत. लोकेश राहुल ५७ आणि रिषभ पंत ७ धावांवर खेळत होते. त्यानंतर दोन वेळा प्रत्येकी एक व प्रत्येकी दोन चेंडू टाकल्यानंतर पावसानं एन्ट्री घेतली अन् खेळ दोन वेळा थांबवण्यात आला. पावसानं त्यानंतर विश्रांती न घेतल्यानं दुसऱ्या दिवसाचा खेळ ४ बाद १२५ धावांवर थांबवण्यात आला. भारतीय संघ अजून ५८ धावांनी पिछाडीवर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button