
लंडन : भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आपल्या अंतिम ११ सदस्यीय संघांची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात रोहित शर्मा, शुभमन गिल यांना संधी देण्यात आली आहे. यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतला स्थान देण्यात आलं असून वृद्धीमान साहा याला डगआऊटमध्येच बसावं लागणार आहे.
भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. फिरकी गोलंदाजीचं नेतृत्व रविचंद्रन अश्विन करणार असून अष्टपैलू रवींद्र जडेजाला त्याला साथ देणार आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी.




