
जळगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं आहे, त्यामुळे त्यांचं डोकं, मेंदूही सूक्ष्म झाला आहे. त्यामुळेच ते एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असल्याचं म्हणत आहे, अशी जोरदार टीका राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असून ते लवकरच भाजपामध्ये येणार असल्याचं खळबळजनक विधान नारायण राणे यांनी केलं होतं. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आलं असता त्यांनी राणेंवर सडकून टीका केली. नारायण राणे पहिले किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिले आहे. त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा आता निघाला आहे. आधी ते शिवसेनेत अस्वस्थ होते. मग ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले आणि आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सूक्ष्म लघू उद्योग खातं मिळालं. त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं आहे, असा खरमरीत टोला गुलाबराव यांनी राणेंना लगावला आहे.
एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते आनंद दिघे यांचे चेले आहेत. ठाणे येथे शिवसेनेचा झेंडा तेवत ठेवला त्यांचे शिंदे हे चेले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांचा शिंदेंबाबतच अंदाज हा हवामान खात्याप्रमाणे चुकीचा ठरणारा आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.