दुबई : इंडियन प्रिमीयर लीगच्या १४ व्या पर्वाचा ५८ वा अतिशय महत्त्वाचा सामना होता. अंतिम सामन्यात स्थान मिळवलेल्या चेन्नई सुपरकिंग्सला भिडण्यासाठी दिल्ली, केकेआर अर्थात कोलकाता आणि आरसीबी अर्थात बंगळुरू या संघामध्ये चुरस होती. दरम्यान दिल्ली गुणतालिकेत वर असल्याने आरसीबी आणि केकेआरमधील विजेता संघ अंतिम सामन्यात एन्ट्रीसाठी दिल्लीशी भिडणार होता. याच लढतीती आरसीबी केकेआरकडून ४ गडी राखून पराभूत झाल्यामुळे स्पर्धेहबाहेर गेली आहे. कोलकाता आता अंतिम सामन्यात जाण्यासाठी दिल्लीसोबत मंगळवारी भिडणार आहे.
सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीच्या फलंदाजाना खास कामगिरी करता न आल्याने ते केवळ १३८ धावापर्यंत पोहचू शकले. ज्या धावा केकेआरच्या केकेआरच्या गिल, अय्यर, राणा आणि नारायण या सर्वांनी मिळून केल्या. ज्यामुळे केकआरचा संघ ४ विकेट्सनी विजयी झाला आहे.
अम्पायरच्या तीन चुकीच्या निर्णयाचा बंगळुरूला फटका बसला, संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारे फलंदाज अपयशी ठरले आणि त्यामुळे माफक धावांचा बचाव करण्यात गोलंदाजांनाही अपयश आले. बंगळुरूच्या गोलंदाजांनी शर्थीचे प्रयत्न करत सामन्यात चुरस निर्माण केली होती. कोलकाता नाइट रायडर्सनं हा सामना जिंकून क्वालिफायर २ मध्ये स्थान पक्के केलेच, परंतु त्यांनी विराट कोहलीचे कर्णधार म्हणून जेतेपद पटकावण्याचे स्वप्नही धुळीस मिळवले. बंगळुरूचा कर्णधार म्हणून विराटही ही अखेरची स्पर्धा होती, आता तो फक्त खेळाडू म्हणून बंगळुरूचा सदस्य असणार आहे. त्यामुळे त्याला जेतेपदाची भेट देण्याचे सहकाऱ्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण, देवदत्तच्या विकेटनंतर कोलकाता नाइट रायडर्स विराट कोहली अँड टीमची गाडी घसरली. ० बाद ४९ वरून बंगळुरूचा डाव ७ बाद १३८ असा गडगडला. कोलकाताच्या सुनील नरीन यानं के भरत, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स व ग्लेन मॅक्सवेल या चार महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी पाठवून बंगळुरूचे कंबरडे मोडले. प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याच्या निर्धाराला नरीननं तडा दिला.
विराट कोहली व देवदत्त पडिक्कल या जोडीनं थोडासा सावध पण आश्वासक खेळ करताना बंगळुरूची धावसंख्या हलती ठेवली. देवदत्तनं विराटसह पहिल्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. ल्युकी फर्ग्युसननं देवदत्तची विकेट घेतली. त्यानंतर सुनील नरीनचाच जलवा पाहायला मिळाला. प्रती षटक एक विकेट असे त्यानं ४ षटकांत २१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करून घेताना बंगळुरूच्या धावसंख्येला लगाम घातली. विराटनं ३३ चेंडूंत ५ चौकारांसह ३९ धावा केल्या. २०१४नंतर नरीननं पहिल्यांदाच विराटची विकेट घेतली. बंगळुरू विरोधात सुनील नरीननं आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा एकाच सामन्यात चार विकेट्स घेण्याचा पराक्रम केला अन् एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला.
शुबमन गिल व वेंकटेश अय्यर यांनी कोणताही धोका न पत्करता सावध खेळ करून पहिल्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. हर्षल पटेलच्या स्लोव्हर चेंडूवर गिलचा अंदाज चुकला अन् तो २९ धावा करून माघारी परतला. राहुल त्रिपाठीला ( ६) युझवेंद्र चहलनं पायचीत केले. मैदानावरील अम्पायरनं त्रिपाठीला नाबाद ठरवले होते आणि विराटनं डीआरएस घेतला, त्यात तो बाद ठरला. या निर्णयानंतर विराटनं मैदानावरील अम्पायरशी हुज्जत घातली. ११व्या षटकात वेंकटेश अय्यर ( २६) हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पण, सुनील नरीननं मैदानावर येताच तिन सलग षटकार खेचून कोलकातावरील दडपण हलकं केलं.
१५व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात नितिश राणानं ( २३) विकेट टाकली. चहलनं ४ षटकांत १६ धावांत २ विकेट्स घेतल्या. १७व्या षटकात हर्षलच्या गोलंदाजीवर देवदत्तनं कोलकाताच्या नरीनचा झेल सोडला अन् सामन्याला कलाटणी मिळता मिळता राहिली. १७व्या षटकातपर्यंत बंगळुरूनं मॅच विनर गोलंदाज हर्षल व युझवेंद्र यांचा कोटा पूर्ण केला होता. डॅन ख्रिस्टियनच्या एकाच षटकात नरीननं तीन खणखणीत षटकार खेचून त्यालाही गपगार केले होते. हर्षलनं १९ धावांत २ विकेट्स घेताना या स्पर्धेत सर्वाधिक ३२ विकेट्स नावावर केल्या.
कोलकाताला विजयासाठी १८ चेंडूंत १५ धावा करायच्या होत्या.१८व्या षटकात मोहम्मद सिराजनं कोलकाताला धक्का देताना नरीनला ( २६) त्रिफळाचीत केलं. त्याच षटकात सिराजनं एका अप्रतिम चेंडूवर दिनेश कार्तिकलाही ( १०) माघारी पाठवले. यष्टीरक्षक के भरतनं सुरेख झेल टिपला. आता सामन्यात खरी चुरस निर्माण झाली होती. सिराजनं त्या षटकात ३ धावा देत २ बळी टिपले आणि सामना १२ चेंडू १२ धावा असा अटीतटीचा झाला. सिराजनं १९ धावांत २ विकेट्स घेतल्या. जॉर्ज गार्टननं १९व्या षटकात ५ धावा दिल्या. ख्रिस्टियनच्या पहिल्याच चेंडूवर शाकिबनं पॅडल स्वीप मारून चौकार मिळवला. पहिल्याच चेंडूवर शाकिबनं दडपण झटकले अन् कोलकातानं ४ विकेट्स राखून सामना जिंकला.