
मुंबई : संयुक्त किसान मोर्चाने दिनांक २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली असून या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. केंद्रसरकारच्या काळ्या कृषी कायद्याविरोधात गेल्या १०० दिवसापेक्षा जास्त दिवस देशातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. यामध्ये आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. शिवाय गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळेच शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे आणि या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे.
भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा संयुक्त किसान मोर्चा या बॅनर खाली देशातील ५०० पेक्षा जास्त संघटना एकत्र येऊन दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बांधव शांततामय मार्गाने केंद्र सरकारने केलेले काळे कृषि कायदे रद्द करणेबाबत आंदोलन करत आहेत. आतापर्यंतच्या या आंदोलनात जवळपास ३००हून अधिक शेतकर्यांचे बळी गेलेले आहेत. केंद्रातील भाजपच्या सरकारने सार्वजनिक संपत्तीची विक्री करणारे जनविरोधी निर्णय घेतलेले आहे. इंधन व गॅस सिलेंडरच्या झालेल्या प्रचंड दरवाढीने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागले आहेत. या सर्व बाबींना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने दि. २६ मार्च २०२१ रोजी भारत बंदची हाक दिलेली आहे. २६ मार्च २०२१ रोजीच्या भारत बंदला आपल्या पक्षाने पाठिंबा दिलेला असून आपण जिल्हा, तालुका पातळीवर निर्धाराने सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे.